कोरोना संकटात सर्व पॅथींनी एकत्र येऊन काम करावे  - All Pathy shall come togather to Fight covid-19 | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संकटात सर्व पॅथींनी एकत्र येऊन काम करावे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

"कोरोना' महामारीमुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यानिमित्ताने आरोग्यसेवा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखीत झाले. यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आरोग्यक्षेत्रात संशोधनाला पर्याय नाही. आपण आरोग्यक्षेत्रात संशोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले. 
 

नाशिक : "कोरोना' महामारीमुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यानिमित्ताने आरोग्यसेवा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखीत झाले. यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आरोग्यक्षेत्रात संशोधनाला पर्याय नाही. आपण आरोग्यक्षेत्रात संशोधन केले पाहिजे, या आणिबाणीच्या काळात सर्व पॅथींनी एकत्र येउन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले. 

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे तसेच सौर उर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन आज राज्यपाल कोश्‍यारी यांनी केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर उपस्थित होते. यावेळी श्री. कोश्‍यारी यांनी कोरोनाचा निर्भयपणे व ठाम राहून मुकाबला केला पाहिजे. प्रत्येकाने त्यासाठी सज्ज रहावे असा सल्ला दिला. आरोग्य विद्यापीठाच्या सौर प्रकल्पाचे कौतुक त्यांनी केले. ते म्हणाले, सौर उर्जेला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रोत्साहन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जेला अधिक व्यापक स्वरुप प्राप्त करुन दिले. त्याचे अतिशय चांगले परिणाम येत्या काळात आपल्याला दिसतील. 

राज्यपाल यावेळी म्हणाले, सध्या जगभर कोरोनाची चर्चा आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. या काळात आर्युवेद, होमिओपॅथी यासारख्या पॅथींनीही एकत्रित येत काम केले. हे खरोखरच वाखानण्यासारखे आहे. मात्र यापुढे अशा महामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाला, नव्या प्रयोगांना चालना दिली पाहिजे. डॉक्‍टरांचे काम हे तसे सोपे नाही. या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी, आव्हानांना सामोरे जावे लागते, त्यामुळे ते सोपे नाही. हा असे क्षेत्र आहे, की आयुष्यभर लोकांसाठी काम करता येते. शिक्षण तर महत्त्वाचे आहेच, मात्र वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. त्याकरीता नेतृत्व गुण हवेत. नेतृत्वाची ही भूमिका घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावावा. 

आयुर्वेदात उपयुक्त औषधे 
राज्यपाल यावेळी म्हणाले, भारतीय पुरातन पॅथी शराराची प्रतिकार शक्ती आणि आरोग्यासाठी गुणकारक आहे. यामध्ये संशोधन व जागरुकता करावी. आर्युवेदात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने चांगली औषधे आहेत. कोरोना काळात अनेकांनी होमिओपॅथीचे उपचार घेतले. त्याचा त्यांना चांगला लाभ झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोनासारख्या वैद्यकीय संकटाच्या काळात सर्वच पॅथी उपयुक्त ठरु शकतात. त्यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर द्यावा. 
... 
 
 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख