विजय वडेट्टीवारांविरोधात रामकुंडावर भाजपचा शंखनाद - Agitation against Minister wadettiwar at nashik. BJP politics | Politics Marathi News - Sarkarnama

विजय वडेट्टीवारांविरोधात रामकुंडावर भाजपचा शंखनाद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी साधूंविषयी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. त्यांनी साधूंचा अपमान करणारे वक्तव्य करु नये. याविषयी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अद्यात्मिक आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

नाशिक : मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी साधूंविषयी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. त्यांनी साधूंचा अपमान करणारे वक्तव्य करु नये. याविषयी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अद्यात्मिक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी शहरातील रामकुंडावर कार्यकर्ते व साधूंनी शंखनाद करीत घोषणा दिल्या.

मंत्री वडेट्टीवार यांनी नुकतेच साधुंबद्दल वक्तव्य केले होते. ते वक्तव्य अयोग्य आहे. त्यासाठी माफी मागावी अशी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले व त्यांच्या सहका-यांनी आंदोलन केले.

यावेळी श्री. भोसले म्हणाले की, साधुंचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. श्री. वडेट्टीवार मनोरुग्ण मंत्री आहेत. साधुंच्या वेशातल्या दोन- चार भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणुन सर्वस्वाचा त्याग करुन साधना करत असलेल्या साधु परंपरेला अशी विशेषणे लावणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधु परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा त्यांच्या पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे.

ते म्हणाले, राज्य सरकारचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात. शारजील सारख्या व्यक्ती इथे येऊन हिंदुंना शिव्या घालून जातात. आता तर मंत्रीच साधुंना शिव्या देत आहेत. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्री मंडळाला लाजवेल असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे असे म्हणावे लागेल.

यावेळी भाजपचे नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे, रामसिगं बावरी, महंत भक्तीचरणदास, उत्तम उगले, सुनिल केदार, ऋषीकेश आहेर, हर्षल वाघ, चंद्रशेखर पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, अविनाश पाटील, सुरेश मानसिंगानी, विजय बनसोडे, अनिल वाघ, गणेश सानप, सोमनात बोडके यांसह विविध कार्यकर्ते व साधू उपस्थित होते.

..

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख