प्रशासकपद गेले...आता कोरोना जाऊ दे अन्‌ निवडणुका होऊ दे!  - Administration chance lost...now all praying for election | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशासकपद गेले...आता कोरोना जाऊ दे अन्‌ निवडणुका होऊ दे! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदाच्या खुर्चीचे स्वप्न गाव पुढारी पाहत होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्यावर पाणी फिरले. त्यामुळे हे सर्वच गाव पुढारी राजकारणापासून अलिप्त झाल्याचे चित्र आहे.

येवला : ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदाच्या खुर्चीचे स्वप्न गाव पुढारी पाहत होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्यावर पाणी फिरले. त्यामुळे हे सर्वच गाव पुढारी राजकारणापासून अलिप्त झाल्याचे चित्र आहे. हे सर्व आता लवकरात लवकर कोरोना जावो आणि निवडणूका होऊन पुन्हा ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा आपल्या हाती येवो, यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. 

कायदेशीर अडचण नको म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 493 ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे या गावाना आता सरकारी सरपंच मिळाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. जिल्ह्यातील एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपलेल्या 102 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे. तर जुलैत 37, ऑगस्टमध्ये 459, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्‍टोबरमध्ये 10, नोव्हेंबरमध्ये 1, डिसेंबरमध्ये 10 अशा 519 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या रिक्त जागांवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. त्यात मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची म्हणजे गाव पुढाऱ्याची नियुक्तीच्या हालचाली झाल्या. मात्र न्यायालयाने शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. त्यात विस्तार अधिकारी व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्यात होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या नियुक्‍त्या मुदत संपूनही रेंगाळल्याने अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढल्याने ग्रामपंचायतींना सरपंच मिळाले आहेत. 

ग्रामपंचायतीवर त्या-त्या तालुक्‍यातील कृषी,शिक्षण,आरोग्य,सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी तसेच कृषी अधिकारी,प्रशासन अधिकारी,पर्यवेक्षिका शाखा अभियंता व काही ठिकाणी केंद्रप्रमुखाची देखील नियुक्ती झाली असून मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी सहायक गटविकास अधिकाऱ्यांवरही दिली गेली आहे.यामुळे गेल्या महिन्यापासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभाराचा रुतलेला गाडा वळणावर येणार आहे. यामध्ये कोरोनाने राजकीय नेत्यांना निवडणूकीपासून वंचित ठेवले. न्यायालयाच्या ओदशाने कारभारापासून लांब ठेवले. त्यामुळे संधी हुकलेले गाव पुढारी आता मनोमन कोरोनाचे संकट जावो, निवडणूका होवो अन्‌ पुन्हा गावाचा कारभार आमच्या हाती येवो यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यांची ही इच्छा केव्हा फलद्रूप होते याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे. 
... 
"मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर बाबी तपासूनच सर्व नेमणुका झाल्या आहेत. आता प्रशासक कारभार पाहणार आहेत. नवे सदस्य अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक असतील.'

- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक. 
...  
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख