Suraj Mandhare
Suraj Mandhare

प्रमाणापेक्षा जास्त पॅाझिटिव्ह रिपोर्ट; दातार जेनेटिक्समध्ये चाचण्यांना बंदी 

येथील दातार जेनेटिक्स या खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या लॅबच्या अहवालांबाबत महापालिका प्रशासनाने काही शंकास्पद मुद्दे उपस्थित केले होते.

नाशिक : येथील वादग्रस्त दातार जेनेटिक्स या खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या लॅबच्या अहवालांबाबत महापालिका प्रशासनाने काही शंकास्पद मुद्दे उपस्थित केले होते. या लॅबमध्ये तपासणीस दिलेल्या नमुण्यांचे पॅाझिटिव्ह अहवालांचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार असल्याने ही कारवाई करण्यात आली. 

शासकीय व खासगी लॅबमध्ये येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्‍ह अहवालाचा मुद्दा खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्‍या बैठकीत गाजला होता. यासंदर्भात केलेल्‍या सखोल चौकशीत तीन लॅबची कार्यप्रणाली संशयाच्‍या भोवऱ्यात सापडली आहे. दातार जेनेटिक्‍स यांच्‍याकडे कोरोनाच्‍या चाचण्या करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. लॅब बंद का करण्यात येऊ नये, असा खुलासा लॅबच्‍या अस्‍थापनेकडून मागविला आहे. अन्‍य दोन लॅबची सखोल चौकशी करण्यासह जिल्ह्यातील लॅबच्‍या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी (ता. २७) दिले. 
दातार कॅन्सर जेनेटिक्‍ससोबतच थायरोकेअर, सुप्रिम डायग्‍नोस्‍टिक येथे होणाऱ्या चाचण्यांसंदर्भात संशय व्‍यक्‍त केला आहे. जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणामार्फत जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी आदेश जारी केले आहेत. त्यात म्‍हटले आहे, की मे. दातार आरटीपीसीआयर प्रयोगशाळेने पुनश्‍च आयसीएमआर व एनआयव्‍ही या शासकीय संस्‍थांकडून प्रयोगशाळेची व उपलब्‍ध यंत्र सामग्रीचे प्रमाणीकरण करावे. या प्रयोगशाळेचे संपूर्ण कामकाज विहित मार्गदर्शक तत्त्वे आणि मापदंडाप्रमाणे होत आहे की नाही याबाबत संबंधित शासकीय संस्‍थांकडून फेरप्रमाणीकरण करून घेत अहवाल कार्यालयास सादर करावा. दातार प्रयोगशाळा कायमस्‍वरूपी बंद का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा आस्‍थापना चालकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. अप्रमाणित कार्यपद्धती अनुसरणे, अहवालात दिसून आलेली गंभीर तफावत तसेच, सर्वाधिक नमुने तपासले जात असल्‍याने चुकीचे अहवाल दिल्‍यामुळे होणाऱ्या परिणामांची सर्वाधिक व्‍याप्ती विचारात घेता या सर्व बाबी जनआरोग्‍याच्‍या दृष्टीने घातक आहेत, असा ठपका ठेवला आहे. 

थायरोकेअरबाबत ठाणे जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र 
थायरोकेअर लॅबसंदर्भात ठाण्याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यासंदर्भात पाठपुरावा जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांनी करावा व याबाबत अहवाल यथाशीघ्र प्राप्त करून घेण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. तसेच, सुप्रिम डायग्‍नोस्‍टिक या लॅबचे पॉझिटिव्‍हीटी रेट अवास्‍तव असल्‍याने सकृतदर्शनी दिसत असल्‍याचा ठपका ठेवला आहे. या प्रयोगशाळेतील नमून्‍यांचेदेखील यापूर्वी अनुसरलेल्‍या कार्यपद्धतीनुसार पडताळणी करून सविस्‍तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक व महापालिकेचे मुख्य आरोग्‍य अधिकारी यांना दिले आहेत. 
--- 
अशी आहे तफावत.. 
तपासणी अहवालानुसार शासकीय प्रयोगशाळांचा पॉझिटिव्‍ह रेट ७.८ टक्‍के आहे. दातार कॅन्‍सर जेनेटिक्‍स व थायरोकेअर या दोन प्रयोगशाळांचा पॉझिटिव्‍ह रेट वीस टक्‍यांपेक्षा अधिक आहे. तर, सुप्रिम डायग्‍नोस्‍टिक यांचा पॉझिटिव्‍ह रेट १८.७ टक्‍के आहे.  
..
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com