महसूल वाढीची युक्ती... वाळू लिलावांची संख्या वाढवणार ! - Administration apply new concept for Increasing Revenue | Politics Marathi News - Sarkarnama

महसूल वाढीची युक्ती... वाळू लिलावांची संख्या वाढवणार !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

नाशिक विभागाला राज्य शासनाने जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे ७२८ कोटींचे उद्दीष्टे दिले आहे. त्यामुळे  विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत वाळू लिलावांची सख्या वाढवून महसूल वाढीवर भर दिला जाणार आहे. 

नाशिक : नाशिक विभागाला राज्य शासनाने जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे ७२८ कोटींचे उद्दीष्टे दिले आहे. त्यामुळे  विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत वाळू लिलावांची सख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यंदा पाऊस, अतिवृष्टी आणि नदीत पाणी असल्याने वाळू साठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु अशा परिस्थितीत पारंपारिक पद्धतीचा वापर करुन वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.  नियम व दंडाची कारवाई सक्त केल्यावर देखील विविध भागात वाळू चोरीच्या घटना घडतच असतात. या स्थानिक वाळूचोरीला त्याने आळा बसण्याची शक्यता आहे. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, कोरोना काळात महसूल विभागाचा उत्पन्नाच्या कामांवर परिणाम झाला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सर्व महसूल अधिकाऱ्यांनी महसुलाच्या वसूलीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. पर्यावरण समितीकडे गेलेल्या वाळू लिलावाबाबतच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन प्रकरणे मार्गी लावावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरुन सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू लिलावाबाबत साप्ताहिक आढावा बैठक घेण्याची सूचना करावी.

महसूल विभागात एकूण ६५ वाळू गट लिलावासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी ३१ वाळू गट पर्यावरण समितीच्या परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबधित अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरात लवकर पाठपुरावा करुन वाळू लिलावांची संख्या वाढीवर भर द्यावा, असेही श्री. गमे यांनी सांगितले. 

दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (नाशिक), जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (नगर), जिल्हाधिकारी  संजय यादव (धुळे), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड नंदुरबार, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन (जळगांव), उपायुक्त (प्रशासन) अरुण आनंदकर, उपायुक्त अर्जुन चिखले, प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, सहआयुक्त स्वाती थविल, सहआयुक्त प्रतिभा संगमनेरे, उपसंचालक भूमिअभिलेख ए. एस. कुलकर्णी, तहसिलदार नरेश बहिरम, तहसिलदार महेश चौधरी,  तहसिलदार योगेश शिंदे उपस्थित होते.

https://scontent.fbom17-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख