अब्दुल सत्तार म्हणाले, सावधान, कोरोनाच्या दुस-या लाटेचे संकेत - Abdul Sattar says covid-19 second flow may come | Politics Marathi News - Sarkarnama

अब्दुल सत्तार म्हणाले, सावधान, कोरोनाच्या दुस-या लाटेचे संकेत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मालेगाव महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरले होते. यावेळी सगळ्यांनाच चिंता वाटत होती. यावेळी मालेगावात युनानी डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविडयोद्धांची भूमिका बजावली, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मालेगाव : शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मालेगाव महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरले होते. यावेळी सगळ्यांनाच चिंता वाटत होती. यावेळी मालेगावात युनानी डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविडयोद्धांची भूमिका बजावली, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

राज्यमंत्री सत्तार यांनी मालेगावचे नागरिक व डॉक्टरांच्या टिमचे कौतुक केले. त्यांच्यामुळेच या संकटावरक मात करता आली. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. यासंदर्भात प्रतिबंध व जागरुकता हाच त्यावर पर्याय आहे,

श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत मालेगावातील मन्सुरा कॅम्पसमध्ये कोविडयोद्ध्यांच्या सत्कार झाला. यावेळी ते म्हणाले, युनानी डॉक्टरांनी संकट काळात प्रशासनासोबत उभे राहून मन्सुराच्या सर्व टिमने चांगला आदर्श घालून दिला. अशा स्थितीत आगामी अनलॅाकडाऊनची प्रक्रीया सुरु झाली आहे. विविध स्तरावर संस्था, दुकाने खुली होत आहेत. त्यामुळे नागरिकांत बेफिकीरी वाढू शकते. असे होता कामा नये. हा गाफीलपणा अडचणीचा ठरु शकतो.  

श्री. सत्तार म्हणाले, की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सुमारे ४०० युनानी डॉक्टरांच्या टिमने प्रशासनासोबत काम केले. त्यामुळे मालेगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांत मोठ्या सामाजिक संकटाला परतवून मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात प्रशासनासह युनानी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मालेगाव काढ्यानेही रुग्णांना दिलासा देऊन रुग्णांचे मानसिक स्थैर्य अबाधित राखण्यात मोठा हातभार लावला. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. येणारे सण, उत्सव साजरे करताना नागरिकांनी गाफील राहता कामा नये. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी माजी मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार आसिफ शेख, डॉ. अर्शाद मुखतार, तहसीलदार चंद्रजित राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, प्रदीप बच्छाव, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आदींसह कोविडयोद्धे व वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख