शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर : कांदाप्रश्‍नी शेतकरी - व्यापारी भेटणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (ता. २८) नाशिकमध्ये येताहेत. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांचे ते सांत्वन करतील. तसेच मुंबईला परतण्यापूर्वी कांदाप्रश्‍नी शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी श्री. पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या झालेल्या वांद्याची व्यथा मांडतील.
Sharad Pawar
Sharad Pawar

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (ता. २८) नाशिकमध्ये येताहेत. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांचे ते सांत्वन करतील. तसेच मुंबईला परतण्यापूर्वी कांदाप्रश्‍नी शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी श्री. पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या झालेल्या वांद्याची व्यथा मांडतील.

श्री. पवार यांचे पुण्यातून सकाळी पावणेअकराला नाशिककडे प्रयाण होईल. पावणेबाराला भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानावर ते हेलिकॉप्टरने येतील. त्यानंतर दुपारी सव्वाबाराला ते थेट वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अंबड लिंक रोडवरील कदंबवनातील ‘बबूल' निवासस्थानी पोचतील. कुटुंबियांचे सांत्वन करुन सव्वाला ते एमरॉल्ड पार्कमध्ये येतील. याठिकाणी शेतकऱयांच्या संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी कांद्याच्या प्रश्‍नी भेट घेणार आहेत. दुपारी अडीचला ते भुजबळ नॉलेज सिटीकडे रवाना होतील आणि सव्वातीनला हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे प्रयाण करतील. पालकमंत्री छगन भुजबळ हे मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी बुधवारी मुंबईत थांबणार आहेत. मात्र आज श्री. भुजबळ यांनी श्री. पवार यांच्याशी संवाद साधला. माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयवंत जाधव आदींनी श्री. पवार यांच्या दौऱयाची तयारी केली.

केंद्राचे निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचे : भुजबळ
केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांमध्ये मोठी नाराजी आहे. कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. म्हणजेच केंद्र सरकारचे निर्णय शेतकऱ्यांना अडचणीचे ठरताहेत, असे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगले भाव मिळायला सुरवात झाली, तर नियम आणि अटी टाकून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 

ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभावाचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? हा खरा प्रश्‍न आहे. मधल्या काळात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते. आता सर्व बाजारपेठा चालू झाल्या असताना सुरवातीला केंद्राने निर्यातबंदी केली. त्यानंतर इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणला. कांद्याच्या व्यापाऱ्यांवर अनेक ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे टाकण्यात आले. मग कांदा साठवणुकीला मर्यादा आणल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱयांनी काय करायचे? यासंबंधाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.''

जिल्हाभरात रास्ता-रोकोचा इशारा
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू न झाल्यास जिल्हाभरात रस्ता रोको करणार, असा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. त्यांनी कांदाप्रश्‍नी पालकमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. श्री. दिघोळे म्हणाले, ''केंद्र सरकारने घाऊक कांदा खरेदीची साठा मर्यादा २५ टनांची केल्याने त्याला विरोध म्हणून जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये कांदा व्यापारी सहभाग घेत नाहीत. ऐन सणासुदीच्या काळात व रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याचे काम वेगात सुरू असताना कांदा उत्पादकांना आर्थिक तरतुदीची गरज आहे. त्यासाठी साठवलेला कांदा बाजार समित्यांमध्ये विक्री करणे गरजेचे आहे. मात्र बाजार समित्यांमधील लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे."

व्यापाऱयांची उद्या नाशिकमध्ये बैठक
कांदा साठवणुकीच्या निर्बंधामुळे व्यापाऱयांनी खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी गेल्यावर पुन्हा लिलावात सहभागी होण्याची भूमिका स्विकारली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एका दिवसाची ८० हजार क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर सहकार विभागातर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २९) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली आहे. त्यामध्ये व्यापाऱयांचे म्हणणे ऐकून घेऊन तोडगा काढण्यासाठीच्या उपाययोजना केला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिली.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com