बाळा नांदगावकरांचा गितेंना टोमणा, `जिथे भेळ तिथे खेळ` - Bala Nandgaokar criticise Vasant Gite On Shivsena issue | Politics Marathi News - Sarkarnama

बाळा नांदगावकरांचा गितेंना टोमणा, `जिथे भेळ तिथे खेळ`

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

काही नेत्यांना पक्ष बदलण्यासाठी निमित्त हवे असते. पक्ष सोडण्यासाठी ते विविध लोकांना जबाबदार धऱतात. स्वतःला अतिशय मोठे नेते म्हणणा-यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एकच मैत्रीपूर्ण सल्ला आहे, आता तरी गेल्या घरी सुखी रहा.

पुणे : काही नेत्यांना पक्ष बदलण्यासाठी निमित्त हवे असते. पक्ष सोडण्यासाठी ते विविध लोकांना जबाबदार धऱतात. स्वतःला अतिशय मोठे नेते म्हणणा-यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एकच मैत्रीपूर्ण सल्ला आहे, आता तरी गेल्या घरी सुखी रहा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या वसंत गिते यांच्याविषयी फेसबुकवर दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते वसंत गिते यांनी नुकताच भाजपचा राजीनामा देऊन शविसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर दोषारोपण केले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेचे स्थानिक नेते वसंत गिते यांनी पुन्हा मनसेमध्ये यावे यासाठी विनंती करायला गेले होते. यावेळी श्री गिते यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर श्री. नांदगावकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

श्री. नांदगावकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील काही `अतिशय मोठे` नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे नेते मोठे नेते आहेत. ज्यांनी मनसेची चलती असतांना सेना सोडली. भाजपची सत्ता असतांना मनसे सोडली. एव्हढ्या निष्ठावंत नेत्यांवर काय बोलणार. यांचे `` जिथे भेळ तिथे खेळ`` अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायमच टालत आलो आहे. परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला, आता तरी गेल्या घरी सुखी रहा.
     
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख