यशोमती ठाकूर यांनी भाजप महिला आघाडीस भेट नाकारली  - Yashomati Thakur refused to meet BJP Mahila Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

यशोमती ठाकूर यांनी भाजप महिला आघाडीस भेट नाकारली 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

त्यावेळी पोलिस व महिलांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. 

जळगाव : राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात भेट नाकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निदशने केली. 

महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर या आज (ता. 27 नोव्हेंबर) जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेत त्या आढावा बैठकीसाठी आल्या होत्या. त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, श्रीमती ठाकूर यांनी भेट नाकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. 

पोलिसांशी शाब्दीक चकमक 

मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले, त्यावेळी पोलिस व महिलांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. 

भाजप महिला आघाडीच्या दीप्ती चिरमाडे, महापौर भारती सोनवणे, ऍड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मंत्री, यशोमती ठाकूर यांनी आमच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारला हवे होते, त्यांनी अशा प्रकारे पळ काढणे योग्य नव्हते, असे मत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर आणि तरुणींवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात निवेदन देण्यात येणार होते, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय? : उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले 

पुणे ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणीही सीरियसली घेत नाही. ऐकू पण नयेत, असली लोक आहेत ही. पवार मोठे नेते मान्यच. पण, त्यांच्यावर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे, अशा सवाल करत शरद पवारांवर टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल "सामना'चे संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यात पवार यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली. 

संजय राऊत यांनी याबाबत मुलाखतीत बोलताना पवार हे देशातील, राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांच्याविषयी भाजपचे नेते सांगताहेत की ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही. ते लोकनेते नाहीत, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की होय, ते प्रमुख नेते आहेत, त्यांना आता 80 वर्षे पूर्ण होत आहेत. पण, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कोणी सीरियसली घेत नाहीत. ऐकू पण नयेत, असली लोकं आहेत, ही. 

संजय राऊतांनी त्यांना पुढे विचारले की हा महाराष्ट्राचा आणि आपल्या नेत्यांचा अपमान आहे हा. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, मान्य. पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे. कोणी काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं. कशाला वेळ घालवतायत त्यात, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना अनुल्लेखाने मारले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख