विधानसभा अध्यक्षपदासाठी के. सी. पाडवींचे नांव? - Will Congress Leader K C Padvi get Legislative assembly speaker post | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदासाठी के. सी. पाडवींचे नांव?

कैलास शिंदे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यांचे आदिवासी विकास मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ्ॅड. के. सी. पाडवी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर खानदेशात तिसऱ्यांदा हे पद मिळणार आहे.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यांचे आदिवासी विकास मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ्ॅड. के. सी. पाडवी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर खानदेशात तिसऱ्यांदा हे पद मिळणार आहे. राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. 

हे पद काँग्रेसकडे आहे. मात्र हे पद शिवसेनेकडे देवून त्याबदल्यात एक मंत्रिपद अधिक घेण्याचा काँग्रेस पक्षाचा विचार होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हे पद खुले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.या वादात सध्यातरी हे पद कॉंग्रेसने आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातर्फे अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अॅड. के सी पाडवी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

असे झाल्यास हे पद खानदेशात तिसऱ्यांदा मिळणार आहे. अॅड. पाडवी हे खानदेशातील नंदुरबार जिल्यातील अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार आहेत.ते आठव्यांदा या मतदार संघातून काँग्रेस पक्षा तर्फे निवडून आले आहेत.या पूर्वी हे पद दोन वेळा खानदेशात होते.सन १९९० ते १९९५,या कालावधीत मधुकरराव चौधरी हे विधान सभेचे अध्यक्ष होते. ते खानदेशातील रावेर मतदार संघातून निवडून आले होते.

तर सन १९९९ ते २००४ या कालावधीत अरूणभाई गुजराथी विधानसभा अध्यक्ष होते. ते खानदेशातील चोपडा मतदार संघातून निवडून आले होते. राज्य विधानसभेचे सर्वोच्च पद खानदेशात तिसऱ्यांदा मिळणार असले तरी खानदेशाला अद्याप मुख्यमंत्री पद मिळालेले नाही. रोहिदास दाजी पाटील, मधुकरराव चौधरी या दोन कॉंग्रेस नेत्यांना तर एकनाथ खडसे या तत्कालीन भाजप नेत्याला मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख