धक्कादायक : जळगावात कोरोना लसीची चोरी; अधिकारी म्हणतात मिटवून घ्या - Shocking: Corona vaccine stolen in Jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : जळगावात कोरोना लसीची चोरी; अधिकारी म्हणतात मिटवून घ्या

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

गाडीत लसीकरण कसे केले यावरही नागरिक या व्हिडिओत आक्षेप घेताना दिसत आहेत. 

जळगाव  ः  राज्यासह देशभरात कोविडच्या लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. राज्यभरातील अनेक केंद्रे लसीअभावी बंद ठेवावी लागत आहेत. हे एकीकडे चित्र असताना जळगाव जिल्ह्यात लसीची चोरी झाल्याची घटना घडली असून ती लस संबंधित दोन परिचारकांनी एका मोटारीत नागरिकांना दिल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.  

जळगाव जिल्ह्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीची दोन परिचारिकांनी चोरी करून मोटारीमध्ये लसीकरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याच केंद्रातील अधिकाऱ्यांनी लसीचे दोन व्हायल चोरीला गेल्याचे सांगून माफी मागून प्रकरण मिटविण्याची विनंती करत आहेत.

कानळदा येथील रस्त्यावर काही नागरिकांनी एका मोटारीला अडवले आहे. त्या ठिकाणी दोन परिचारिकांनी त्या मोटारीमधील व्यक्तींना लसीकरण केले असल्याचा आरोप नागरिक या व्हिडिओमधून करीत आहेत. ज्या ठिकाणी ह्या परिचारका दिसत आहेत, मोटारीमधील नागरिक हे त्या गावचे नाहीत. तसेच, गाडीत लसीकरण कसे केले यावरही नागरिक या व्हिडिओत आक्षेप घेताना दिसत आहेत. 

याच संदर्भात दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात काही नागरिक याच कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीच्या चोरीबाबत विचारपूस करीत आहेत. त्यावेळी या व्हिडिओत ते अधिकारी कोरोना लसीच्या दोन व्हायल चोरीला गेले असल्याचे सांगत आहेत. तसेच, माफी मागून हे प्रकरण मिटविण्याचे बोलत आहेत. परंतु नागरिक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. 

या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे लस नसल्याने ज्येष्ठांसह नारिकांना लसीकरण केंद्रातून माघारी परतावे लागत आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असताना दुसरीकडे असे गैरप्रकारही घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख