कोटीच्या `रोलेट` जुगाराचा सूत्रधार पोलीसांच्या जाळ्यात

राज्यभर ऑनलाइन रोलेट जुगार गेमिंगच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त करीत अनेकांचे कुटुंब देशोधडीला लावल्याचा आरोप असलेला कैलास शहा याच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले.
Rolet Shaha
Rolet Shaha

नाशिक : राज्यभर ऑनलाइन रोलेट जुगार गेमिंगच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त करीत अनेकांचे कुटुंब देशोधडीला लावल्याचा आरोप असलेला कैलास शहा याच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. ग्रामीण पोलिसांनी आज त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला कोठडी देण्यात आली.

आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे शेती विक्रीतील पाच लाख हरल्याने एकाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. मात्र वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या संशयित कैलास शहा याला नाशिक येथे एका हॉटेलजवळ बुधवारी रात्री गजाआड केले. यात शांताराम पगार आणि सुरेश अर्जुन वाघ यांचाही समावेश असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

आंबोली येथील तरुण शेतकरी संदीप दिलीप मेढे (वय २७) रोलेट जुगारात सुमारे पाच लाख रुपये हरला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याच्या वडिलांना शेती विकावी लागली. शहर- जिल्ह्यात अनेक तरुण मुले रोलेटच्या आहारी गेल्याने अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. शहरातही आमहत्या झाल्या आहेत. याप्रकरणी मृत संदीप मेढे याच्या वडिलांनी रोलेट ऑनलाइन गेमिंगचा सूत्रधार कैलास शहा याच्याविरोधात मुलाच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून संशयित शहा फरारी आहे.

यंत्रणेवर प्रभाव
संशयित कैलास शहा याच्या रोलेट ऑनलाइन जुगार गेमिंगचे राज्‍यभर प्रस्थ असून, त्यातून त्याने कोट्यवधीची माया जमविल्याचा आरोप आहे. अल्पावधीतच संशयित शहरातील मोठा अवैध सावकार म्हणूनही नावारूपाला आला होता. रोलेटच्या आधीन होऊन अनेक कुटुंब उद्ध्‍वस्त होत असूनही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने पोलिस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात होती. रोलेट हा ऑनलाइन प्रकार असल्याने त्यावर पोलिसांनी नव्हे, तर परवानगी देणाऱ्या यंत्रणेने गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेत, पोलिस आयुक्तांनी सगळ्या यंत्रणाकडे बोट दाखवत एकत्रित कारवाईची मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यंना पत्र दिले होते. महसूल व पोलिस यंत्रणेत त्याच्यावरील कारवाई करण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. इतका त्याचा दबदबा होता. विधानसभेत संशयित कैलास शहा यांच्यावरील कारवाईचा मुद्दा गाजला. विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांनी त्याच्यावर कारवाई का होत नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले होते.

या ऑनलाइन गेमिंगमधील प्रस्थ असलेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी आज त्याला न्यायालयापुढे हजर करीत, त्याच्या गेमिंग सिस्टिमशी संबधित संगणक, मोबाईल ॲप्लिकेशन, आयपी ॲड्रेस, मदर आणि चाईइल्ड आयडी, ऑपरेटिंग सिस्टिम, सर्व्हर आदी साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे हा विषय केवळ आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या फौजदारी गुन्ह्यापुरता मर्यीदत नसून माहिती तंत्रज्ञान कायदा, त्यातून आर्थिक साम्राज्य उभे केल्याने आर्थिक गुन्हेगारीशी संंबंधित आहे. या सगळयाचा गुंता सोडविण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
...
रोलेट ऑनलाइनमुळे फसले गेले असाल अशा सगळ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संर्पक साधावा. रोलेटमुळे आत्महत्या केल्या असतील, अशांच्या कुटुंबांनी पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात.

- सचिन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नाशिक. 
.
..
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com