राज ठाकरेही म्हणाले....मी पुन्हा येईन....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या दौ-यासाठी नाशिकला येऊन गेले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी हॉटेलच्या परिसरात दोन दिवसांपासून ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांना राज यांनी मुंबईकडे परतताना दर्शन दिले.
Raj Thackeray
Raj Thackeray

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या दौ-यासाठी नाशिकला येऊन गेले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी हॉटेलच्या परिसरात दोन दिवसांपासून ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांना राज यांनी मुंबईकडे परतताना दर्शन दिले. या वेळी ते म्हणाले, ‘मी पुन्हा येईन, गटप्रमुखांचा मेळावा पुढील महिन्यात होईल. त्या वेळी मार्गदर्शन करेन’, एवढाच संदेश देत ते मुंबईला परतले.  

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील. त्यातून ऊर्जा मिळेल व नव्या जोमाने निवडणुकीला तोंड देता येईल, ही अपेक्षा फोल ठरली. राज ठाकरे आले व गेलेही, मात्र अस्वस्थता कायम राहिल्याची भावना बळावली आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर नाशिककरांनी सत्तेच्या रूपाने मनसेला भरभरून दान दिल्याने एकेकाळी नाशिक शहर मनसेचा बालेकिल्ला बनले. महापालिकेत सत्ता, तीन आमदार, जिल्हा परिषदेत चार सदस्य व पंचायत समित्यांमध्ये मनसेची ताकद वाढली. मात्र सध्या तशी स्थिती नाही. त्यामुळे राज ठाकरे येतील आणि उर्जा देऊन जातील अशीच सगळ्यांना अपेक्षा होती. त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा होता.

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही महापालिकेतील मनसेची सत्ता गेली. चौळीस नगरसेवकांतील जवळपास पंचवीस नगरसेवकांनी पक्षाला राम  राम केला. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या चाळीसवरुन पाचवर घसरली. गेल्या सव्वा चार वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपतील सत्तेला स्वबळावर आव्हान देणे पक्षाला शक्य झालेले नाही. यावरुन पक्षातच ज्येष्ठ  व कनिष्ठ यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे भाजपला अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष मदत करुन मनसे सत्तेत सहभागी झाल्याचे दिसले.

महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने प्रचाराचा धडाका लावताना शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे. भाजपने विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. काँग्रेस अद्याप अंतर्गत लाथाळ्यांमध्येच रंगले आहे. महापालिका हद्दीत भाजप व शिवसेनेला तोंड देऊ शकेल एवढी ताकद मनसेकडे आहे. परंतु पक्षीय पातळीवर निवडणुकांच्या अनुषंगाने कुठलीच तयारी नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. मनसेकडे अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्याचा मोठा ओघ असल्याचा दावा केला जात असला तरी त्यांच्याकडे निश्‍चित दिशा नाही.

पक्षाध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये येतील, मार्गदर्शन करतील व कार्यकर्त्यांमध्ये बळ चढून निवडणुकीच्या तयारीला लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु ठाकरे यांनी त्यांचा तीन दिवसांचा नियोजित दौरा गुंडाळून परतल्याने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळण्याऐवजी त्यांच्यातील अस्वस्थताच अधिक वाढल्याचे दिसून आले. मुळात ४ मार्चला त्यांचे आगमन होणार होते. मात्र, एक दिवस पुढे ढकलले. 

५ मार्चला सकाळी साडेअकराला त्यांचे आगमन झाले. त्यानंतर दोन तास हॉटेलमध्येच थांबले. त्यानंतर दोन ते अडीच तास त्यांनी खासगी भेटीगाठी केल्या. सायंकाळी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. रात्री मुक्कामाला असले तरी त्या काळातही कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली नाही. ६ एप्रिलला सकाळी अकराच्या सुमारास मुंबईकडे परतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संवादाऐवजी विसंवादच वाढल्याची भावना बळावली.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com