रिमोट गिरीश महाजनांकडेच, जयकुमार रावल नामधारी! 

आमदार जयकुमार रावल यांच्याकडे काही दिवसांपूर्वी जेव्हा नाशिक भाजपचं प्रभारीपद आलं, तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्यांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकारणाची कल्पना आहे, त्यांना भाजपची ही खेळी अविश्वसनीय वाटली. राज्यात सत्ता असताना महाजनांनी नाशिकवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यशही मिळालं.
Girish Mahajan
Girish Mahajan

नाशिक : राज्यात सर्वाधिक १०५ आमदार निवडून आल्यानंतरही सत्तेपासून वंचित राहिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मनात सत्ता न मिळाल्याची सल कायम आहे. त्यामुळे येत्या वर्ष, दोन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवताना सूक्ष्म नियोजनही केले जात आहे.

नाशिकच्या बाबतीत बोलायचे झाले, तर स्थायी समिती सदस्य निवडीच्या माध्यमातून ही बाब अधोरेखित झाली. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा निश्‍चित होणाऱ्या नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपमध्ये घरवापसी झाल्यानंतर भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राजकीय उलथापालथीचा एक अध्याय संपला. स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून आता महापालिका निवडणुकीचा दुसरा राजकीय अध्याय सुरू झाला आहे. 

महाजनांकडे रिमोट कंट्रोल 
आमदार जयकुमार रावल यांच्याकडे काही दिवसांपूर्वी जेव्हा नाशिक भाजपचं प्रभारीपद आलं, तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्यांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकारणाची कल्पना आहे, त्यांना भाजपची ही खेळी अविश्वसनीय वाटली. राज्यात सत्ता असताना महाजनांनी नाशिकवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यशही मिळालं. सत्तेची सूत्रे आपल्याकडे राखण्यात ते यशस्वी ठरले. मधल्या काळात नाशिक भाजपची सूत्रे दोंडाईचाचे आमदार रावल यांच्याकडे आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उजवे-डावे अशी महाजन-रावल यांची ओळख. महाजनांकडून नाशिकचा कारभार काढून फडणवीस तो रावलांकडे सोपवतील, असं वाटलं नव्हतं आणि तेच स्थायीच्या निमित्तानं सत्तेचा रिमोट कंट्रोल रावल यांच्याकडे नव्हे, तर तो महाजनांकडेच असल्याचं अधोरेखित झालं. त्यामुळे या खेळीत सध्यातरी रावल नामधारी दिसतात. 

आमदार देवयानी फरांदेंना शह 
स्थायी समितीत भाजपाचे आठ सदस्य आहेत. या सदस्यांची निवड करताना गिरीश महाजन यांची राजकीय कुशाग्रता दिसून आली. आपल्या समर्थकांची निवड करत दबदबा कायम ठेवताना पक्षांतर्गत कट्टर विरोधक असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांना त्यांनी शह दिला. फरांदे यांनी सुचविलेली तिन्ही नावं बाजूला ठेवत हिमगौरी आडके यांना स्थायीत स्थान दिले. हा फरांदे यांच्यासाठी एक मोठा संदेश आहे. हिमगौरी भविष्यातील फरांदे यांच्या स्पर्धक मानल्या जातात. त्यांच्याकडे नजीकच्या काळात शहर भाजपतील महत्त्वाचं पददेखील दिलं जाऊ शकतं, अशी कुजबूज आहे.

स्थायीच्या आठ नव्या सदस्यांमध्ये रावलसमर्थक केवळ माधुरी बोलकर आहेत. माजी महापौर रंजना भानसी, सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, मुकेश शहाणे, प्रतिभा पवार आणि विद्यमान सभापती गणेश गिते स्थायीत भाजपचे सदस्य आहेत. माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपत पुन्हा डेरेदाखल झाले. पक्षात पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी त्यांना सध्या कसरत करावी लागतेय. मुलगा मच्छिंद्रला स्थायीत स्थान मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. पण त्यांचीही डाळ महाजनांनी शिजू दिली नाही. पक्षात पुर्नप्रवेश केल्यानंतर लगेचच महत्त्व दिल्याचा संदेश निष्ठावंतांमध्ये गेला असता, म्हणून महाजनांच्या जवळचे असूनही सानपांना पदापासून दूर ठेवलं असावं.

बाळासाहेब सानप यांच्याकडे १२-१५ नगरसेवकांचा गट आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांना सामावून घ्यावेच लागेल. महाजन-फरांदे यांच्यात फारसा ताळमेळ कधीच नव्हता. आमदार सीमा हिरे सर्वांपासून समान अंतर राखून आहेत. तर आमदार राहुल ढिकलेही वादात न पडणं पसंत करतात. कुठल्या गटाचा शिक्का सध्यातरी त्यांच्यावर नाही. आगामी महापालिकेची रणनीती आखणं सुरू झालेलं असताना नाशिक भाजपचा विचार करता पुढचा सामना महाजन-फरांदे असाच रंगू शकतो. प्रश्न उरतो तो जयकुमार रावल यांचा. रावल स्वभावानं आक्रमक असले तरी त्यांना पुढे करून त्यांच्याआडून महाजन हेच सगळी सूत्रं हलवतील, असंच चित्र सध्यातरी दिसतंय.  
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com