जळगाव : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी प्रस्थापित दिग्गजांना धक्का देत गावगाडा तरुणाईच्या हाती सोपविण्याचा कौल दिला. माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कोथळी ग्रा.पं.त खडसे परिवार पुरस्कृत पॅनलने वर्चस्व राखले. तर गिरीश महाजनांच्या जामनेर तालुक्यात बहुतांश ग्रा.पं. भाजपने स्वत:कडे राखल्या.
जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ६८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होऊन दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढल्या जात नाही, त्यामुळे विजयी पॅनलवर सर्वच पक्ष दावे- प्रतिदावे करत असतात. असे असले तरी राजकीयदृष्ट्या विचार करता भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेने अनेक ग्रा.पं.वर वर्चस्व राखले. काँग्रेसनेही काही ग्रा.पं. ताब्यात राखल्यात.
जळगाव : नवख्यांची बाजी
जळगाव तालुक्यात ४८ ग्रा.पं.साठी मतदान झाले. बहुतांश गावांमध्ये नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्का देत बाजी मारली. पालकमंत्री गुलाबराव पाटील समर्थकांचे तालुक्यात वर्चस्व राहिले. भादली गावी तृतीयपंथीय उमेदवार अंजली पाटील विजयी झाले.
भुसावळ : सावकारे-चौधरींत चुरस
तालुक्यात २४ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते. लढतींमध्ये आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरींच्या समर्थकांमध्ये चुरस दिसून आली. दोन ग्रा.पं. सावकारेंनीच बिनविरोध निवडून आणल्या. उर्वरित ठिकाणी संमिश्र चित्र दिसले.
मुक्ताईनगर : भाजपला धक्का
तालुक्यात ४७ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते. खडसेंच्या कोथळी गावी अटतटीच्या लढतीत खडसे परिवार समर्थक पॅनलने वर्चस्व राखले. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर तालुक्यात भाजपला धक्का बसल्याचे चित्र दिसले.
बोदवड : काँग्रेसला धक्का
बोदवड तालुक्यात २९ ग्रा.पं.साठी मतदान झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे वीरेंद्रसिंग पाटील पुरस्कृत पनलला नाडगावात तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या पुतण्यास मनुर बु. गावातून पराभवास सामोरे जावे लागले. काही ग्रा.पं. राष्ट्रवादी तर तुरळक सेनेने राखल्या.
जामनेर : भाजपचे वर्चस्व
तालुक्यात ६७ पैकी ४० पेक्षा जास्त ग्रा.पं.त माजी मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखालील भाजप समर्थकांच्या पॅनलने विजय मिळविल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीने काही ठिकाणी भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे चित्र आहे.
रावेर : संमिश्र कौल
रावेर तालुक्यात ४८ ग्रा.पं. पैकी नेत्यांनी लक्ष घातलेल्या गावांमध्ये त्यांनी पुरस्कृत केलेले पॅनल विजयी झाले. मात्र बहुतांश ग्रा.पं.त संमिश्र कौल दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपने काही भागात वर्चस्व राखल्याचे चित्र आहे.
यावल : प्रस्थापितांना धक्का
यावल तालुक्यातील ४६ ग्रा.पं.त मतदान झाले होते. माजी आमदार दिवंगत हरिभाऊ जावळेंच्या भालोद गावी १५ पैकी ११ जागा जिंकत भाजप पुरस्कृत पॅनलने हरिभाऊंना श्रद्धांजली वाहिली. अन्य ग्रा.पं.त काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपचे वर्चस्व राहिल्याचे चित्र आहे.
चोपडा : सेना, राष्ट्रवादीचा प्रभाव
चोपडा तालुक्यात ४२ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते. नव्या चेहऱ्यांनी प्रस्थापितांना धक्का देत बाजी मारली. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीने बहुतांश जागांवर विजय मिळविल्याचे चित्र आहे.
अमळनेर : सर्वपक्षीय कौल
अमळनेर तालुक्यात ५० ग्रा.पं.साठी मतदान झाले. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये तरुण मतदारांनी बाजी मारल्याचे चित्र असून या तालुक्याने सर्वच पक्षातील समर्थक उमेदवारांना कौल दिल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीचे विजयाबाबत दावे- प्रतिदावे सुरु आहेत.
पारोळा : सेना-राष्ट्रवादीत चुरस
पारोळा तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादीची वर्चस्वासाठी चुरस दिसून आली. आमदार चिमणराव पाटलांच्या देवगाव या गावी सेना पुरस्कृत पॅनलने वर्चस्व राखले. तर टेहू या माजी खासदार वसंतराव मोरेंच्या गावी त्यांनी पुरस्कृत केलेले पॅनल विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार प्रथमच तालुक्यात निवडून आला आहे.
एरंडोल : सेनेचे वर्चस्व
तालुक्यात २९ ग्रा.पं.साठी मतदान झाले. पैकी बहुतांश ग्रा.पं.त सेना समर्थकांच्या पॅनलने बाजी मारली. त्याखालोखाल भाजप व राष्ट्रवादीनेही काही ठिकाणी वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील निपाणे ही ३० वर्षांपासून काँग्रेसच्या संजय पाटील पुरस्कृत समर्थकांच्या ताब्यातील ग्रा.पं. यंदा प्रथमच सेना समर्थकांनी काबीज केली.
चाळीसगाव : भाजप-राष्ट्रवादीचा प्रभाव
तालुक्यात १० ग्रा.पं. बिनविरोध होऊन ६६ ग्रा.पं.साठी मतदान झाले. संपूर्ण तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी समर्थकांनी वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा जि.प. सभापती पोपटतात्या भोळे यांच्या वाघळी गावी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी झाले. तर आमदार मंगेश चव्हाणांचे गाव असलेल्या हिंगोणे ग्रा.पं. बिनविरोध झाली आहे.
पाचोरा : तरुणाईचे वर्चस्व
पाचोरा तालुक्यातील ८४ पैकी १२ ग्रा.पं. बिनविरोध होऊन ७२ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते. आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या समर्थकांनी त्यांचे गड कायम राखले. तर अमोल शिंदे यांच्या समर्थकांनीही बऱ्याच ठिकाणी बाजी मारत प्रभाव दाखविला. तालुक्यात तरुण उमेदवार बहुसंख्येने विजयी झालेत.
ठळक वैशिष्ट्ये
- कोथळीत खडसेंचे वर्चस्व कायम
- मुक्ताईनगर तालुक्यात भाजपला फटका
- जामनेर तालुक्यात भाजपचे वर्चस्व
- पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा प्रभाव कायम
- बऱ्याच ठिकाणी एकेका मताचा फरक
Edited By - Amit Golwalkar

