NCP state president Jayant Patil to visit Jalgaon | Sarkarnama

EXCLUSIVE -जयंत पाटील करणार खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चाचपणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते येथे बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ते चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते येथे बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ते चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी  मंत्री एकनाथ खडसे आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातआक्रमक झाले आहेत.गेल्या आठवड्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेवून हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला असे ते जाहीरपणे बोलले. यानंतर खडसे यांनी  पक्ष सोडण्याबाबत थेट भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागली आहे. 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा या आधीपासूनच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात जोरदार इन्कमिंग करीत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे जर पक्षात प्रवेश करीत असतील तर त्याचा फायदा पक्षाला उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात किती होईल, याबत जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विधानरिषदेतील काही जागा ऑक्टोबर महिन्यात रिक्त होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर खडसे यांना घेण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जयंत पाटील २३ रोजी जळगाव दोऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जळगाव जिल्हा अधक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी या दौऱ्याला दुजोरा दिला आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख