Nashik Rural SP Aarti Sing's BodyGuard Found Corona Positive | Sarkarnama

धक्कादायक : नाशिक अप्पर पोलिस उपअधिक्षकांचा अंगरक्षकच निघाला कोरोना' पॉझिटिव्ह!

संपत देवगिरे
बुधवार, 13 मे 2020

आज आलेल्या १२५ अहवालांपैकी बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व पोलिस कर्मचारी आहेत. यामध्ये जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांचा अंगरक्षक देखील पॉझिटिव्ह आढळल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात 'कोरोना' बाधीतांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे. आज आलेल्या १२५ अहवालांपैकी बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व पोलिस कर्मचारी आहेत. त्यांनी मालेगाव येथे बंदोबस्त केला आहे. हे सर्व नाशिक आणि जालना येथील आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांचा अंगरक्षक देखील पॉझिटिव्ह आढळल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ७२१ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ६९६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये ७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. यातील तेहेतीस जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात ३९, नाशिक ग्रामीण भागात ८५ आणि मालेगाव शहरातील ५५१ तसेच जिल्ह्याबाहेरील २१ रुग्ण आहेत. आज आलेल्या १२५ अहवालांत २२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. १०३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पॉझिटिव्ह रुग्णांत सर्व पोलिस कर्मचारी आहेत. त्यात हिम्मत नगर पोलिस ठाण्याचा एक, जालना येथील सहा आणि नाशिक ग्रामीण पोलिसांतील पंधरा आहेत. त्यात तीन नाशिक रोड येथील असुन त्यांचे भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत बारा जणांना आडगाव येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेले सर्व पोलिस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेले होते. ते सर्व मालेगावशी संबंधित आहेत.  त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या तेथे संपर्कात आलेल्या पोलिसांची आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देऊन तपासणी होत आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनला पन्नास दिवस उलटलेले आहेत. या पन्नास दिवसांत नाशिकची कोरनाबाधीतांची संख्या ७२१ वर पोहोचली आहे. १४ एप्रिलला पहिले पन्नास रुग्ण आढळले. त्यानंतर २९ एप्रिलला ती ३०० झाली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शंभरने वाढ झाली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. सध्या पोलिस व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारीही कोरोना बाधीत आढळत असल्याने प्रशासन सजग बनले आहे.

दोन बालके पडली कोरोनाच्या संकटातून बाहेर

दरम्यान, कोरोना नावाच्या राक्षसाने, अजगरासारखे सापडेल त्याला गिळंकृत करण्याची मोहीमच हाती घेतली. त्याचे लक्ष्य प्रामुख्याने छोटी मुले आणि वयोवृद्ध. त्याला चीतपट करण्याची ताकद ठेवणारेही अनेक आहेत. मात्र, त्यात विशिष्ट वयोगटाचे प्राबल्य नाही, हेच सिद्ध केलंय इथल्या दोन निरागस बालकांनी. अवघ्या बारा आणि सोळा दिवसांची ही बालके 'रिअल फायटर्स' म्हणून कौतुकास पात्र ठरली आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख