सभेपूर्वी मटणावर ताव; नंतर श्रीरामाचे नांव; धुळे जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध संतापाची लाट - Mutton Party in Dhule Zilla Parishad Being Criticized | Politics Marathi News - Sarkarnama

सभेपूर्वी मटणावर ताव; नंतर श्रीरामाचे नांव; धुळे जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध संतापाची लाट

निखिल सुर्यवंशी
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

येथील जिल्हा परिषदेवर बहुमताने भाजपची सत्ता आहे. एकूण ५५ सदस्य असून त्यात भाजपचे ३९, महाविकास आघाडीचे १६ सदस्य आहेत. यात काही सदस्यांनी मटणावर ताव मारला. काही सदस्यांनी श्रावणामुळे शाकाहार पसंत केला. यानंतर सभा झाली. ती भाजपच्या विरोधक सदस्यांकडून झालेल्या आरोपांमुळे गाजली. एकीकडे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करत देशाला संबोधित करत होते. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते सांगत होते. त्यावेळी जिल्हा परिषद सभास्थळी मटणावर ताव मारण्याचा बेत सुरू होता

धुळे : श्रावण मास आणि एकीकडे अवघा देश अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (ता. ५) डोळ्यात साठवीत असताना येथील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी मटणावर ताव मारला. नंतर त्यांनी सभेस उपस्थिती दिली. सभा संपल्यावर सदस्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. हा प्रकार समजल्यानंतर संबंधित सदस्यांविरोधात टीकेची झोड उठली. सोशल मीडियावर विरोधकांकडून निषेधाचे सत्र सुरू झाले. यात संबंध नसताना जिल्हा परिषदेला बदनामी सहन करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळल्याने आणि सभागृहात शारीरिक अंतर राखता येत नसल्याने गोंदूर (ता. धुळे) शिवारातील साई लक्ष्मी लॉन्समध्ये दुपारी दोननंतर सभा झाली. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे अध्यक्षस्थानी होते. सीईओ वान्मती सी., उपाध्यक्षा कुसुम निकम, सभापती रामकृष्ण खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी व्यासपीठावर होते. सभेस महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे या गैरहजर होत्या.

विरोधकांकडून निषेध
येथील जिल्हा परिषदेवर बहुमताने भाजपची सत्ता आहे. एकूण ५५ सदस्य असून त्यात भाजपचे ३९, महाविकास आघाडीचे १६ सदस्य आहेत. यात काही सदस्यांनी मटणावर ताव मारला. काही सदस्यांनी श्रावणामुळे शाकाहार पसंत केला. यानंतर सभा झाली. ती भाजपच्या विरोधक सदस्यांकडून झालेल्या आरोपांमुळे गाजली. एकीकडे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करत देशाला संबोधित करत होते. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते सांगत होते. त्यावेळी जिल्हा परिषद सभास्थळी मटणावर ताव मारण्याचा बेत सुरू होता. सभेपूर्वी मटणावर ताव, नंतर सभा आटोपल्यावर श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सदस्यांनी केले. हा प्रकार सायंकाळनंतर शहरासह जिल्ह्यात पसरल्यावर `त्या` मांसाहारी सदस्यांविरुद्ध टीकेची झोड उठली. तसेच संताप व्यक्त झाला. शिवसेनेसह भाजपच्या इतर विरोधकांनी सोशल मीडियावर या प्रकाराचा निषेध केला. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेला येथे काहीसा तडा गेल्याचा सूर उमटला.

प्रशासनाचा संबंध नाही
अनेक वर्षांपासून सभेपूर्वी जेवणावळीचा प्रघात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे वैयक्तीक खर्चातून रोटेशन पद्‌धतीने जेवणाची मेजवानी देतात. त्याच्याशी जिल्हा परिषद प्रशासनाचा काहीही संबंध नसतो. या स्थितीत शाकाहारी सदस्य आणि जिल्हा परिषद प्रशासनाला नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचाही सूर अधिकारी वर्गात उमटला.

तीन बोकड फस्त
जिल्हा परिषदेच्या सभेपूर्वी झालेल्या मेजवानीत मांसाहारी सदस्यांनी तीन बोकडांचे मटण फस्त केले. ते शिजविण्याची विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. यासंदर्भात विरोधी ज्येष्ठ सदस्यांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत चौकशीची मागणी केली. यात बुधवारी नेमकी कुणी मटणाची मेजवानी दिली, त्याचे नाव जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख