छगन भुजबळांचा दौरा होताच महापौर सतीश कुलकर्णीही सराफ बाजारात पोहोचले!

दोन दिवसांपूर्वी शहरात पहिला पाऊस झाला. या पावसाने शहराला धो धो धुतले. त्यात अनेक भागात पाणी शिरले. सराफ बाजार पुर्णतः पाण्यात बुडाला. मोठे नुकसान झाल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे भेट दिली. याची माहिती कळताच भारतीय जनता पक्षाचे नेतेही खडबडून जागे झाले अन्‌ सराफ बाजारात पोहोचले.
Nashik Mayor visited Saraf Bajar after water clogging
Nashik Mayor visited Saraf Bajar after water clogging

नाशिक : नाशिकच्या सराफ बाजारात पाणी शिरल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तेथे भेट दिली. हे समजताच नाशिकच्या महापौरांनीही घाईघाईत येथील भेट आयोजित केली. 

दोन दिवसांपूर्वी शहरात पहिला पाऊस झाला. या पावसाने शहराला धो धो धुतले. त्यात अनेक भागात पाणी शिरले. सराफ बाजार पुर्णतः पाण्यात बुडाला. मोठे नुकसान झाल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे भेट दिली. याची माहिती कळताच भारतीय जनता पक्षाचे नेतेही खडबडून जागे झाले अन्‌ सराफ बाजारात पोहोचले. मात्र त्यांनी दौरा करुनही पालकमंत्र्यांनी दिलेलेच आश्‍वासन दिले. यामध्ये राजकारण तापले. मात्र सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या हाती काही पडले नाही. 

सराफ बाजारात पाणी शिरले हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात गोदावरीला पूर आल्यावर सराफ बाजारातील दुकाने पाण्यात बुडतात. तेव्हा दिवस इसो की रात्र सराफांना जागे राहून आपल्या दुकानांची हलवा हलव करावी लागते. नदीपात्रालगत बाजार असल्याने तो पूररेषेत आहे. त्यावर अनेकदा अनेक उपाय सुचविले आहेत. मात्र, महापालिका ठोस काहीच करीत नाही. यंदा मात्र गोदावरीला पूर आला नव्हता. पावसाचे पाणी एव्हढे होते, की त्याने सराफ बाजाराचे हाल झाले. सर्व दुकाने पाण्यात बुडाली.

सराफी व्यावसायिक राजकीय पक्षांशी संबंधित

सराफ बाजारातील व्यावसायिक विविध राजकीय पक्षांशी संबंधीत आहेत. राजकारणातही सक्रीय आहेत. त्यामुळे येथे राजकीय पक्षांचे नेते लागलीच हजर होतात. यंदाही तसेच झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सराफ बाजाराला भेट देण्याचे निश्‍चित केले. तसा निरोप सकाळीच पोहोचला होता. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी एक कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यासाठी सकाळी अकराचा दौरा तीन वाजता निश्‍चित केला. त्याला प्रतिसाद देखील तेव्हढाच मोठा मिळाला. 

सराफ बाजारात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र व्यावसायिकांच्या नुकसानीची माहिती घेताना शहरातील राजकीय वातावरण मंगळवारी चांगलेच ढवळून निघाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्मार्टसिटींतर्गत पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे आश्‍वासित केले. त्यापाठोपाठ महापौर सतीश कुलकर्णी यांनीही भेट देत स्मार्टसिटी अंतर्गत गावठाण विकासाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कायमस्वरूपी प्रश्‍न मिटेल, असे आश्वासन दिले. पावसाळीपूर्व कामांवरून विरोधी पक्ष शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरत कामांची चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादीनेही कामे न झाल्याचे सूचित करत साथीचे आजार पसरू नये म्हणून नालेसफाईची मागणी केली. 

सराफ बाजाराला महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह आमदार प्रा. देवयानी फरांदे, सभागृहनेते सतीश सोनवणे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी भेट दिली. स्मार्टसिटी अंतर्गत गावठाण विकासाचा प्रस्ताव मंजूर झाला. लॉकडाउनमुळे कामाला सुरवात झाली नाही. परंतु लवकरच कामाला सुरवात होऊन प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. स्मार्टसिटींतर्गत सराफ बाजार, दहीपूल भागात काम करताना नगरसेवकांना विश्‍वासात घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र या आश्‍वासनांमध्ये नवे काहीच नसल्याने सराफ व्यावसायिकांच्या हाती फारसे काही पडले नाही, याचीच चर्चा होती. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com