Infighting Increasing in Jalgaon Corprporation Between BJP | Sarkarnama

जळगाव महापालिकेत भाजपच्या सत्तेला मतभेदाचे हादरे; लवकरच फुटीचा भूकंप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

राज्यातील सत्ता गेल्यामुळे महापालिकेवर नेतृत्व करणाऱ्या भाजप नेत्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सद्यस्थितीत कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही,अशा स्थितीत जळगाव महापालिकेत नगरसेवकांचे मक्‍त्यासाठी गटतट पडले असून त्यासाठी वादही सुरू झाले आहेत. त्यात पहिली ठिणगी भुयारी गटारीच्या मक्‍त्यावरून पडली आहे

जळगाव : जळगाव महापालिकेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला अंतर्गद वादातून हादरे सुरू झाले आहेत. लवकरच फुटीचा भूंकप होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. प्रतिक्षा आहे ती फक्त राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदवार नेत्यांनी ताकद देण्याची.

जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची प्रथमच एकहाती सत्ता आली आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या काळात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस व सुरेशदादा जैन यांच्या शहर विकास आघाडीतील नगरसेवकांना भाजपत प्रदेश देवून त्यांना उमेदवारी दिली होती. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार केला आणि जनतेत विश्‍वास निर्माण करून ५७नगरसेवकांच्या विजयाचे भले मोठे यश मिळविले. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तर शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले, तर एमआयएमचे तीन नगरसेवक विजयी झाले.

महापालिकेवर प्रथमच एकहाती सत्ता आल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेसाठी कोट्यवधीच्या निधीची घोषणा केली होती. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणून जळगाव शहराचा आपण अवघ्या सहा महिन्यात कायापालट करू अशी घोषणाही केली होती. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सौ.सीमा भोळे भाजपच्या पहिल्या महापौर झाल्या. 

केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे अमृत योजना, भुयारी गटारी योजनासाठी तातडीने निधी आला त्याचे कामही सुरू झाले, त्यानंतर सफाईचा एक मुस्त मक्‍ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला. त्या शिवाय राज्य सरकारकडून शंभर कोटीच्या निधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यासाठी अगोदर दिलेले २५ कोटी रूपये खर्च करण्याची यादी देण्याचेही सूचविण्यात आले. निधीचे कोटीचे आकडे आणि होणारी कामे यामुळे नवीन निवडून आलेले नगरसेवक भाजपमध्ये खूष होते.

विधानसभेनंतर सगळेच बदलले
राज्यात विधानसभा निवडणूक लागली. मात्र लोकसभेत भाजप व शिवसेना एकत्र निवडून आली असल्याने विधानसभेत राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्‍वास भाजपच्या नगरसेवकांना होता. मात्र राज्यात सत्ता बदल झाला भाजपची सत्ता जावून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता आली. त्यामुळे महापालिकेतही सगळेच बदलले महापालिकेला मिळणारे निधीचे आकडे कागदावरच राहिले, महापालिका निवडणूकीत नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही महापालिकेच्या कारभारात लक्ष देणे कमी केले.

मनप भाजपत अंतर्गत वाद
राज्यातील सत्ता गेल्यामुळे महापालिकेवर नेतृत्व करणाऱ्या भाजप नेत्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सद्यस्थितीत कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही,अशा स्थितीत महापालिकेत नगरसेवकांचे मक्‍त्यासाठी गटतट पडले असून त्यासाठी वादही सुरू झाले आहेत. त्यात पहिली ठिणगी भुयारी गटारीच्या मक्‍त्यावरून पडली आहे. या मक्‍त्याला मंजुरी दिली परंतु त्याचा फायदा झाला नसल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू आहे. त्यानंतर 'वॉटरग्रेस'च्या सफाई मक्‍त्यावरून वाद झाला अखेर हा मक्ता रद्द करण्यात आला. 

शहरातील सफाईचा नवीन मक्ता देण्यात आला त्याला स्थायीत मंजुरी देण्यात आली. मात्र भाजपच्या स्थायीतील नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेवून सभापतीनाच पत्र दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्याचा लेखी खुलासा मागविला आहे.त्यामुळे भाजप नगरसेवकात मतभेद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हा वाद भाजपच्या नेत्याकडे घेवून जाण्याऐवजी थेट आयुक्तांच्या दालनात गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वालाही मानण्यास नगरसेवक तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

३२ नगरसेवकांची यादी
महापालिकेतील मक्‍त्याचे वाद आता विकोपास गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेत एकूण चार गट झाले आहेत. त्यामुळे कोणताही गट कोणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. शिवाय आता भाजपच्या बाहेर पडून सत्तेला सुरूंग देण्याचीही काहींची तयारी आहे. तब्बल ३२ नगरसेवकांची यादी तयार असल्याची चर्चा आता अंतर्गतगटात सुरू झाली आहे. भाजपचे ५७ नगरसेवक आहेत. त्यात एक तृतियांश नगरसेवकांच्या संख्येच्या फुटीच्या बाबतीत आकडे मोजले जात आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादीकडून नेत्यांची प्रतिक्षा
भाजपमधून नगरसेवकांचा मोठा गट फुटून सत्तेला हादरे देण्यास तयार आहे. मात्र राज्यातील सत्तेवर असलेल्या शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून एखाद्या ताकदवार नेत्यांने हमी घेण्यासाठी पुढे येण्याची अपेक्षा आहे. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. मात्र, त्यांचे ग्रामीण भागात वर्चस्व आहे. महापालिकेच्या बाबतीत त्यांना अनुभव नाही. त्यामुळे ते लक्ष घालण्याची शक्‍यता कमीच आहे.

वरीष्ठ स्तरावरील मंत्रीपदाच्या नेत्यांनी हमी घेण्याची अपेक्षा आहे. किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मंत्रीपदावरील नेत्यांनी हमी घेण्याबाबतही प्रतिक्षा आहे. मात्र, सध्यातरी सत्तेतील शिवसेना व राष्ट्रवादीकडील मंत्रीस्तरावरील नेत्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शांतता असली तरी अंतर्गतरित्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, हा भुकंप लवकरच होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख