सुधारणा झाली नाही तर कडेलोट ठरलेलाच... - If Changes will not be there...situation may be worse. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

सुधारणा झाली नाही तर कडेलोट ठरलेलाच...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

शहरात नागरिकांत कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता जाणवते आहे. महापौर महासभा स्थगित करण्यापलिकडे फारसे काही करत नाहीत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सुधारणा झाली नाही तर नाशिकमध्ये कडेलोट ठरलेला आहे.

नाशिक : शहरात नागरिकांत कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता जाणवते आहे. यासंदर्भात प्रशासन पासिंग द पार्सलच्या भूमिकेत आहे. महापौर महासभा स्थगित करण्यापलिकडे फारसे काही करत नाहीत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सुधारणा झाली नाही तर नाशिकमध्ये कडेलोट ठरलेला आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेसच्या प्रवक्त्या व महापालिकेतील गटनेत्या डॅा हेमलता पाटील यांनी दिला आहे. 

त्या म्हणाल्या, नाशिककर करोनाच्या दुस-या लाटेला गांभिर्याने घेत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. मंगल कार्यालये तुडु़ंब भरलेली आहेत. बाजारपेठा ओसांडून वहात आहेत. सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्याची विविध संस्थांची अहमिका लागली आहे. सर्वसामान्यांसाठी लसिकरण कोसो दूर आहे. अशावेळी नाईलाजाने शासनाने लॉकडाऊन जाहिर करण्याची वेळ येऊ नये म्हणुन आत्तापासुन नाशिकमध्ये काय उपाययोजना कराव्यात याबाबत प्रशासकीय यंत्रणा पुर्णपणे सुस्तावलेली आहे. लग्न समारंभात पन्नास लोकांची परवानगी असताना पाचशे ते हजार लोक जमतातच कसे?. यावर कार्यवाही करायची नक्की कुणी? असा प्रश्न डॅा. पाटील यांनी केला. 

त्या म्हणाल्या, पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय? हे सगळे "पासिंग द पार्सल" चा गेम खेळत आहेत. म्हणुनच नागरिक सुसाट सुटले आहेत. लसीविषयी सर्व सामान्यांच्या मनात अनेक समज, गैरसमज आहेत. याबाबत कोणतेही प्रबोधन होताना दिसत नाही. स्वतः लस घेतलेल्या अधिका-यांचे फोटो प्रकाशित करण्याव्यतिरिक्त फारसे काही होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. 

मुंबईमध्ये महापौर रेल्वे स्टेशन पासुन ते हॉटेल पर्यंत लोकांचे प्रबोधन करताना दिसतात.  नाशिकचे महापौर १४४ लागू म्हणुन महासभा तहकूब करण्यात करोनाप्रती आस्था दाखविताना दिसतात. बाकीचे मान्यवर साहित्य संमेलनामध्ये मनपसंत कमिटी मिळविण्यात व्यस्त आहेत. अशा वेळी अचानक लॉकडाऊन झालाच तर परत नाशिकची आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कटविण्याचे पाप नक्की कोणाच्या माथी मारायचे?. की नेहमीप्रमाणे मालेगावच्या नावाने बोटे मोडून सामाजिक ध्रुवीकरण करणार?. नाशिकमध्ये सगळंच गुडी गुडी चाललंय. कोणी कोणाला सुधरवायचे हे नाही ठरले तर कडेलोट ठरलाय हे नक्की.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख