‘बीएचआर’घोटाळ्याशी संबंध नसल्याचा गिरीश महाजनांचा दावा - I have no Relation with BHR Fraud Claims Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

‘बीएचआर’घोटाळ्याशी संबंध नसल्याचा गिरीश महाजनांचा दावा

कैलास शिंदे
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

‘बीएचआर’ठेवी गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला होता. तो महाजन यांनी नाकारला आहे

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)पतसंस्थेत झालेल्या जमीन विक्री घोटाळ्याशी आपला कोणताही संबध नाही. जामनेर येथील जमीन आपण लीलाव झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षानंतर संबधित मालकाकडून खरेदी केली आहे. पारस ललवाणी हे चुकिची माहिती देत आहेत. असे प्रतिपादन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना  केले.

‘बीएचआर’ठेवी गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला. शिवाय जामनेर तालुक्याती शहापूर फत्तेपूर रोडवरील जमीनी त्यांनी खरेदीकेल्या असून यातील उताऱ्यावर गिरीश महाजन व साधना महाजन यांची नावे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यांशी ‘सरकारनामा‘ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, ''बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराशी आपला कोणताही संबध नाही, आपण या पतसंस्थेचे भागीदारही नाही. आपण या संस्थेकडून कधी कर्जही घेतलेले नाही.  आपल्यावर होत असलेले आरोपही चुकिचे आहेत.जामनेर तालुक्याल  सहा एकर जमीन खरेदीच्या व्यवहारात खाते उताऱ्यावर आपले व पत्नी साधना महाजन यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रिसतर करण्यात आला आहे. ही जमीन पुणे  येथील एका उद्योजकाने साडेतीन वर्षापूर्वी खरेदी केली होती. परंतु आता  चार महिन्यापूर्वी ‘कोविड’काळात त्याला अडचण आल्यामुळे त्यांनी जमीन विक्रीस काढली आपण त्यांची खरेदी केली असून त्यांला रिसतर बँकेतून धनादेशाव्दारे पैसेही दिले आहेत,'' त्यामुळे यात गैरव्यवहार करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे?असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

चौकशीत सत्य बाहेर येईलच
बीएचआर पतसंस्थेच्य गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. त्यात काही जणांना अटक करण्यात आली असून काहींची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेवून हा मोठा घोटाळा असून यात अनेक बडे नेते अडकले असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. याबाबत बोलतांना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की याबाबत पुणे येथील पोलीसातर्फे चौकशी सुरू आहे. सत्य काय ते बाहेर येईलच.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख