एकनाथ खडसेंनी दिल्या कट्टर विरोधकास वाढदिवसाच्या शुभेच्छा  - Happy Birthday to Sureshdada Jain by Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

एकनाथ खडसेंनी दिल्या कट्टर विरोधकास वाढदिवसाच्या शुभेच्छा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे व सुरेश जैन हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.

जळगाव : राजकारणात कट्टर विरोधक असले तरी सर्वसामान्य जीवनात तेवढेच चांगले संबध असले पाहिजेत, हे सूत्र आज फारसे जपले जात नाहीत. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपले कट्टर विरोधक आणि शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांचा आज वाढदिवस आहे. जळगाव विधानसभा मतदार संघातून सतत नऊ वेळा निवडून येण्याचा त्यांचा विक्रम आहे.

विशेष म्हणजे त्यांनी पक्ष बदल केला तरी जळगावातील जनतेने त्यांना निवडून दिले होते. या शिवाय जळगाव महापालिकेवर सतत तीस वर्षे त्यांची सत्ता होती. सहकार क्षेत्रातही त्यांनी वर्चस्व गाजवित जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. 

सुरेश जैन सध्या मुंबई येथे आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या समर्थकांनी त्यांना प्रसिद्धी माध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. समर्थकांनी त्यांच्या सोबतचे जुने फोटो प्रसिध्द करून त्या माध्यमातून आठवणींना उजाळा देवून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

दोन्ही नेते  महाविकास आघाडीत

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे व सुरेश जैन हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. राजकारणात दोघांनी आपापले नेतृत्व सिद्ध केले आहे. खानदेशात दोन्ही नेत्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. स्पष्टवक्तेपणा हा दोन्ही नेत्यांचा स्वभाव आहे.

राजकारणात विरोधक असले तरी वैयक्तीक जीवनात दोन्ही नेत्यांचे संबंध चांगले आहेत. अनेक वेळा दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले आहेत. मात्र, आता गेल्या काही दिवसांत घरकुल गैरव्यवहार प्रकरणात सुरेश जैन अडचणीत आहेत तसेच, तब्येतीमुळे ते फारसे राजकारणात सक्रीय नाहीत. 

भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे तेसुद्धा पक्षीय वादात अडचणीत होते. त्यामुळे राजकीय पटलावर दोन्ही नेत्यांचा संवाद नाही. आज एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर सुरेश जैन हे शिवसेनेत आहेत.

राज्यातील सत्तेत दोन्ही पक्ष आज एकत्र आहेत. त्यामुळे विरोधक असलेले दोन्ही नेते आज मित्र पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश जैन यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख