द्राक्ष उत्पादकांनी मागितली मुख्यमंत्री उध्दव ठाकरेकडे दाद

जिल्ह्यात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतकरी आपल्या द्राक्षांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही व्यापारी जाणीवपुर्वक कोरोनाचे निमित्त पुढे करुन द्राक्षाचे भाव पाडत आहेत.
Uddhav Thakre Grapes
Uddhav Thakre Grapes

निफाड : जिल्ह्यात सध्या  द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतकरी आपल्या द्राक्षांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही व्यापारी जाणीवपुर्वक कोरोनाचे निमित्त पुढे करुन द्राक्षाचे भाव पाडत आहेत. अशा व्यापाऱ्याची चौकशी करुन त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने अनेक कटू निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली होती. त्याचा गैरफायदा काही व्यापारी मंडळी घेत असल्याची तक्रार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार द्राक्ष संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या विभागीय बैठकीत यासंदर्भात द्राक्ष उत्पादकांनी व प्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. काही शेतक-यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत.   

यासंदर्भात वनसगाव येथील शेतक-यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी एका द्राक्ष बागायतदाराचा मुलगा, सर्व शेतकऱ्यांच्या मनातील खदखद आपल्याकडे हतबलतेने मांडत आहे. साहेब, नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्ष शेती करण्यात अव्वल मानला जातो. शेतीची मोठी उलाढाल येथे होते. साहेब गेल्या काही वर्षांपासून सततच्या होणाऱ्या बेमोसमी पावसामुळे द्राक्ष शेती करण्याला अधिक खर्च येत आहे. मागच्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान झाले. लाखोंचे खर्च करून हातातोंडाशी आलेला घास आता व्यापारी युनियन करून लॉकडाऊनच्या नावाखाली द्राक्ष मातीमोल दराने खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा, बंगाल अशा अनेक ठिकाणचे हे व्यापारी जिल्ह्यात येऊन खोटी माहिती देऊन कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहे. ..प्रत्यक्षात तेथील दरात आणि येथील दरात प्रचंड मोठी तफावत असल्याचे आढळले आहे.  हेच एक्सपोर्ट कंपनीच्या बाबतीतही लागु आहे. हा हजारो शेतक-यांशी संबंधीत विषय असल्याने राज्य शासनाने चौकशी करावी. भाव पाडणारे व्यापारी व संबंधीतांवर कारवाई करावी.

द्राक्ष उत्पादकांच्या या विषयाची गांभिर्याने दखल घ्यावी. कृषी मंत्री दादा भुसे आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत सखोल चौकशीचे आदेश देण्यात यावे. शेतकऱ्यांसोबत अयोग्य व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन कारवाई करावी. हे असेच सुरु राहिले तर अनेक द्राक्ष उत्पादक शेती करण्यापासून परावृत्त होतील असे, वैभव शिंदे आणि सुभाष जाधव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com