गिते, बागूल शिवसेना प्रवेशाने भाजपला धक्का, राष्ट्रवादीला चिंता! - Gite, Bagul joins Shivsena alarming for BJP, Political News | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

गिते, बागूल शिवसेना प्रवेशाने भाजपला धक्का, राष्ट्रवादीला चिंता!

संपत देवगिरे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज भाजपचा त्याग केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते आजच शिवबंधन बांधतील. हे दोघेही मुळ भाजपचे नाहीत. अन्य पक्षातील आयात नेत्यांचे `पॅालिटीकल इंजिनिअरींग` भाजपच्या सत्तेचा पाया आहे.

नाशिक : माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज भाजपचा त्याग केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते आजच शिवबंधन बांधतील. हे दोघेही मुळ भाजपचे नाहीत. अन्य पक्षातील आयात नेत्यांचे `पॅालिटीकल इंजिनिअरींग` भाजपच्या सत्तेचा पाया आहे. गिते, बागूल यांचा पक्षत्याग भाजपच्या सत्तेच्या या पायालाच हादरा असल्याने त्याला मोठे राजकीय महत्व आहे. 

माजी आमदार वसंत गिते यांचा हक्काचा एक प्रभाग आहे. तेथील तिन्ही नगरसेवक त्यांच्या जनसंपर्कामुळे निवडून आले आहेत. त्यात त्यांचा मुलगा प्रथमेश गिते माजी उपमहापौर आहे. श्री. बागूल यांचा रामवाडी व लगतचा परिसर हक्काचा प्रभाग मानला जातो. सध्याच्या मातोश्री विद्यमान उपमहापौर आहेत. आजी, माजी उपहापौरांनी भाजप सोडला. या संदेशातून गिते, बागूल यांना माननारे अन्य नगरसेवकही हा मार्ग स्विकारू शकतात. दुसरीकडे शिवसेनेत जुनी टीम एकत्र येऊ लागली आहेत. नवे नेते सक्रीय होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गुरुवारी नाशिक दौ-यात त्यांनी शिवसेनेचे `नुतनीकरण` होते आहे, असे विधान केले होते. श्री. गिते व बागूल यांचा शिवसेना प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीचा भाग म्हणून होतो आहे. त्यात भाजपचे नुकसान आहे. महापालिका काबीज करण्याचे स्वप्न पाहणा-या राष्ट्रवादी कॅाग्रेस व पालकमंत्री छगन भुजबळ यांची चिंता वाढवणारेही आहे.       

अबोल नेतृत्वाने मनसेचा घात

राजकारण हा लोकभावना आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांचा समतोल साधत करावे लागते. त्यासाठी शहराचे प्रथम नागरिक बोलके, लोकांत मिसळणारे व जाहिरपणे भूमिका घेणारे हवेत. गेल्या दहा वर्षात नाशिकला तसे घडले नाही. त्यामुळे नाशिककर नव्या पक्षाला संधी देत आले. स्वतःला अतिशय जाणकार समजणारे नेतेही यामध्ये कमी पडतांना दिसतात. विशेषतः नाशिक महापालिकेच्या राजकारणात ही अज्ञात पोकळी सतत राहिली आहे. यापूर्वी शहरात मनसेचे तीन आमदार व महापालिकेत अर्थात सबंध शहरावर सत्ता होती. मनसेने प्रारंभी यतीन वाघ व नंतर अशोक मुर्तडक यांना महापौर केले. यातील वाघ हे स्वभावतः अबोल तर मुर्तडक हे सार्वजनिक ठिकाणी मोजके बोलणारे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यामुळे सदैव चर्चेत राहणारी मनसे जनसामान्यांत मात्र अबोल राहिली. त्यातून या पक्षाला स्थानिक चेहरा नाही असा संदेश गेला. परिणामी निवडणूक येता येता या पक्षाच्या सदतीस पैकी तब्बल पंचवीस नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. 

भाजपची महापालिका सत्तेत रमला

मनसेने केली तीच चुक भारतीय जनता पक्षाने अती आत्मविश्वास व राज्यातील सत्तेचा गर्व यातून केली आहे. गंमत म्हणजे अद्यापही हा पक्ष जमिनीवर यायला तयार नाही. या पक्षाने प्रारंभी रंजना भानसी व नंतर सतीश कुलकर्णी हे महापौर दिलेत. यातील भानसी या अबोल तर कुलकर्णी भाजप म्हणजेच विश्व,, त्याबाहेर जग आहे यावर त्यांचा विश्वासच नाही. परिणामी या पक्षात नगरसेवकांची संख्या 66 मात्र पक्ष म्हणून कोणीच नगरसेवक बाजू मांडतांना दिसत नाही. सध्या शिवसेनेने आक्रमकपणे विस्तार व महापालिकेची सत्ते काबीज करण्याचे सुत्र महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातून केले आहे. त्यात रोज भाजपवर महापालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचारावरुन भाजपला लक्ष्य केले जाते. भाजपवर असे आरोप करण्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस तर शिवसेनेच्याही पुढे आहे. मात्र भाजपचा एकही नेता, महापालिकेतील पदाधिकारी, शहरातील आमदार त्याला उत्तर देत नाही. प्रत्युत्तर द्यावे कोणी? यावर गोंधळ आहे. `भाजपमध्ये नवी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यात जुन्या जाणत्यांचा कोंडमारा होतो आहे` असे पस्तीस वर्षे पक्षात सक्रीय असलेल्या नेत्याची बोलकी प्रतिक्रीया होती. 

आयात नगरसेवक अस्वस्थ

महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या कारभाराचा हा मार्ग कुठे व कोणत्या दिशेला जातोय हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्पष्ट आहे. भाजपचे 66 नगरसेवक आहेत. त्यातील निम्मे नगरसेवक अन्य पक्षातून आयात केलेले आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन फार्मात होते तेव्हा त्यांनी सत्तेच्या जोरावर हा करीष्मा केला. चार सदस्यांची प्रभाग रचना, सत्ता, साधने व सढळ हाताने दिलेला पक्षनिधी हे या यशाचे रहस्य होते. आता सगळेच बदलत आहे. प्रभाग दोन सदस्यांचा तर राज्यात सत्ता महाविकास आघाडीची. त्यामुळे गिते आणि बागूल यांनी केलेले पक्षांतर हा भाजपसाठी राजकीय आलार्म आहे. त्यातून ते सावरणार का? भाजप व परिवाराच्या विचारसरणीमुळे जमिनीपासून चार बोटे वर धावणारा रथ जमिनीवर आणणार का? यावर महापालिकेतील त्यांचे राजकारण स्थिरावणार की गटांगळ्या खाणार हे ठरेल. अन्यथा भाजपमध्ये पक्षाला सोडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांची रांग लागलेली दिसू शकते. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख