भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा.. चाकुचा धाक दाखविल्याचा आरोप - crime against bjp leader girish mahajan in jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा.. चाकुचा धाक दाखविल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विजय पाटील यांनी ता. 9 डिसेंबरला याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

जळगाव : चाकुचा धाक दाखवत धमकावल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांनी फिर्याद देण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विजय पाटील यांनी ता. 9 डिसेंबरला याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

जानेवारी 2018 मध्ये जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावून घेतलं होतं. तिथे मला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. सर्व संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन संस्थेचा कारभार आमदार गिरीश महाजन यांच्या हातात द्यावा, अशी धमकी दिली. त्याचवेळी गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल करून 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असं अॅड. विजय पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

 
2015 मध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या गटानं सहकार कायद्यानं निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांचे 18 सभासद निवडून आले होते. तेव्हापासून मराठी विद्या प्रसारक मंडळ पाटील गटाच्या ताब्यात होती. भोईटे गटाने धर्मदायकडील नोंदणीचा आधार घेत संस्था आपल्याच ताब्यात घेतली होती.

या गुन्ह्याची चौकशी न्यायालयामार्फत करावी, असं महाजन यांनी म्हटलं आहे. राजकारणातील हा हा गलिच्छ प्रकार असून अॅड. विजय पाटील यांचा बोलवता धनी वेगळा असल्याचंही आमदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या प्रकऱणात सुनील झंवर यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख