BHR गैरव्यवहार : तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुखांवरील दबावामुळे चौकशी थांबली : खडसे 

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी आदेश दिल्यानंतरही राज्यात सहकार विभागाकडून चौकशी होत नव्हती.
BHR Fraud : Inquiry stopped due to pressure on then Co-operation Minister Subhash Deshmukh: Khadse
BHR Fraud : Inquiry stopped due to pressure on then Co-operation Minister Subhash Deshmukh: Khadse

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. मात्र, राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आलेल्या राजकीय दबावामुळे ती थांबली. चौकशी करावी, यासाठी आपली देशमुख यांच्याशी शाब्दीक चकमकही झाली होती, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. हा तब्बल अकराशे कोटींचा गैरव्यवहार आहे. त्यात मोठंमोठे नेते अडकले आहेत, पोलिस चौकशीत ते बाहेर येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

"बीएचआर' पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी सुरू असून यातील काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे तसेच या व्यवहारातील जमिनी खरेदी करणारे सुनील झंवर हे फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी खडसे हे पाठपुरावा करीत होते. याबाबतची माहिती देण्यासाठी त्यांनी आज (ता. 30 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. 

या वेळी खडसे म्हणाले की, बीएचआर संस्थेच्या नऊ राज्यांत शाखा आहेत. एकूण 28 हजार सभासद आणि 25 हजार भागधारक, तर 1 लाख 50 हजार नाममात्र भागधारक आहेत. या पतंसस्थेतील संचालकांनी अपहार केल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 2015 मध्ये या पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या अवसायकाने ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे देताना गैरव्यवहार केल्याची तक्रार ऍड.कीर्ती पाटील यांच्या माधमातून ठेवीदार संघटनेने आपल्याकडे केली. 

त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारमधील सहकार मंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली. मात्र, ही मल्टिनॅशनल पत्तसंस्था असल्याने केंद्राकडून तो तपास होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी आपण खासदार रक्षा खडसे आणि ऍड कीर्ती पाटील यांनी केंद्रांतील तत्कालीन मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे राज्याचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक दत्ता पडसलगीकर यांना आदेश दिले. परंतु त्यानंतरही फारशी चौकशी पुढे झाली नाही. 

सहकारमंत्री देशमुखांशी वाद 

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी आदेश दिल्यानंतरही राज्यात सहकार विभागाकडून चौकशी होत नव्हती. त्यामुळे आपण थेट राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली. केंद्रातून आदेश असतानाही चौकशी का थांबली?, अशी त्यांना विचारणा केली. त्यावर माझा देशमुख यांच्याशी शाब्दीक वादही झाला. मात्र, आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे देशमुख यांनी आपल्याला सांगितले. त्यानंतरही मी आणि ऍड कीर्ती पाटील यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. पण, "ईओडब्लू'कडून तपास करण्याऐवजी "एलसीबी'कडून तपास करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com