कोरोना लसीकरणाचा आजपासून ‘ड्राय रन’

जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय, सिद्ध पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगाव आरोग्य केंद्र या ठिकाणे ‘ड्राय रन’साठी निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजपासून शहर व जिल्ह्यात ‘ड्राय रन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय, सिद्ध पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगाव आरोग्य केंद्र या ठिकाणे ‘ड्राय रन’साठी निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

‘ड्राय रन’ नियोजनाबाबत बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. बापू नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, लसीकरण ‘ड्राय रन’साठी निवडलेले आरोग्याधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी आठला ड्राय रनसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना सकाळी नऊला उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. ड्राय रन प्रक्रिया सकाळी दहाला सुरू होईल. जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सिद्धपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगाव येथील आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक नोडल अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून, या टीमने ड्राय रनदरम्यान मास्क व ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड-१९ ड्राय रन लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या वेटिंग रूममध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रत्येक लाभार्थ्याचे तापमान घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये CoWin aap या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंद करण्यात येऊन त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑब्झर्व्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला ३० मिनिट परीक्षणासाठी बसविण्यात येणार असल्याचे श्री. मांढरे यांनी सांगितले.

पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २९ लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध असून, एका वेळेस साधारण ११ लाख डोस साठवणची क्षमता आहे. 
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com