विरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न! - May be Modi wants to take opposition in confident; State politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी संरक्षणमंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले होते. आता मोदींनी त्यांना बोलविले आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. 
 

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. (Sharad Pawar meets PM Modi On Sunday) काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी संरक्षणमंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले होते. (Rajnath singh Also called sharad pawar few days back) आता मोदींनी त्यांना बोलविले आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. मात्र, भेटीत काय झाले याची माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी टिपण्णी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan)यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेसची १९९९ पासूनची निवडणुकांची परंपरा सुरू आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपवाद सोडल्या, तर स्वबळावर लढल्या आहेत. मात्र, विधानसभा, लोकसभांची रणनीती ही केंद्रातून ठरते. अंतिम निर्णय श्रेष्ठी घेत असतात. प्रदेशाध्यक्ष पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवा, आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू, असे सांगत आहेत. मात्र, त्याचा महाआघाडी सरकारवर काही परिणाम होईल, असा तर्क काढणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे चालेल. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. मात्र, अध्यक्षपदी कोण असेल हे काँग्रेस श्रेष्ठी ठरवतील.’’

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही काही जणांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत गोपनीय पत्र दिले होते. मात्र, ते पत्र फुटले आणि प्रकाशित झाले. त्यानंतर आम्ही सात लोकांशी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासमवेत पाच तास चर्चा केली. लवकरच त्यासंदर्भात निर्णय होईल, अशी आशा आहे.’’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार पडणार असे सांगत आहेत, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘विरोधी पक्षांतून सत्तेतील पक्षात जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी सरकार पडेल असे सांगणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे. त्यानुसार विरोधक ते सांगत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार भक्कम असून, ते पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल.’’

राज्य सहकारी बॅंकेला ११०० कोटींचा तोटा असल्याने रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमला. मी मुख्यमंत्री असताना असताना ४९ कारखाने कमी किमतीत विकले गेले. खासगी लोकांनी ते विकत घेतले. त्याची चौकशी सुरू होती. चौकशीत काय निष्पन्न झाले ते सर्वांना माहिती आहे. एखादा भ्रष्टाचार होणे वेगळे आणि मनीलॉड्रिंग होणे वेगळे. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनीलॉड्रिंगसंदर्भातील काही विषय आहे का, याची चौकशीसाठी ईडीची कारवाई असेल, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

ईडीची तडजोड होते की काय?
महाराष्ट्रात ईडीच्या एवढ्या चौकशा सुरू आहेत. मात्र, त्या शेवटपर्यंत जात नाहीत. कुठेतरी अडकून बसते. त्यात काय तडजोड होते, की काय माहीत नाही, असा आरोप करून आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘एकाही ईडीच्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आहे. ती शिक्षा कोर्टाने दिली आहे, हे माझ्या ऐकिवात नाही.’’
...
हेही वाचा...

शिवसेनेची `शिवसंपर्क` अभियानातून निवडणुकीची तयारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख