नाशिकचा दुचाकीचोर 'बुलेटराजा' पिंपरी-चिंचवडमध्ये गजाआड 

तपासादरम्यान त्याने पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून बुलेटसह इतर कंपनीच्या महागड्या दुचाकी चोरून त्या बीड, नगर, धुळे या भागातील नागरिकांना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विक्री केल्याचे उघडकीस आले.
Nashik's motorcycle thief 'Bullet Raja' Arrested in Pimpri-Chinchwad
Nashik's motorcycle thief 'Bullet Raja' Arrested in Pimpri-Chinchwad

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातून नवीन महागड्या दुचाकी चोरायच्या. त्या विकण्यासाठी फेसबुक मेसेंजरवरून ग्राहकाशी संपर्क साधायचा. कागदपत्रे नंतर देतो, असे सांगत दोन लाख रूपये किंमतीच्या दुचाकी अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकणाऱ्या नाशिकमध्ये "बुलेटराजा' अशी ओळख असलेल्या सराईत दुचाकी चोरट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

हेमंत राजेंद्र भदाणे (वय 24, रा. भोरवाडा, सातपूर, नाशिक) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. भदाणे हा 11 सप्टेंबरला अंकुशराव लांडगे सभागृहाच्या समोर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता भोसरीतून दुचाकी चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला. 

तपासादरम्यान त्याने पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून बुलेटसह इतर कंपनीच्या महागड्या दुचाकी चोरून त्या बीड, नगर, धुळे या भागातील नागरिकांना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी सलग चार दिवस धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व नगर या परिसरात थांबून 17 लाख 70 हजार रूपये किंमतीच्या दहा बुलेट व इतर चार अशा एकूण 14 दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये चाकण पोलिस ठाण्यातील तीन, भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी ठाण्यातील प्रत्येकी एक तर पुण्यातील सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर या ठाण्यातील प्रत्येकी एक व नाशिकमधील सरकारवाडा, अंबड या ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण बारा दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आले. 

दरम्यान, भदाणे याने चोरलेल्या दुचाकी विकत घेणारा व विक्रीसाठी मदत करणारा त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (वय 24, रा. गरताड, ता. जि. धुळे) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. 

नाशिकमध्ये 35 ​ गुन्हे दाखल 

भदाणे हा मूळचा नाशिक येथील असून वाहनचोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात 35 व ठाणे शहर हद्दीत 2 असे एकूण 37 वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये तो "बुलेटराजा' म्हणून ओळखला जातो. लॉकडाउनच्या काळात तो नाशिकवरून ट्रक, टेम्पो अशा वाहनाने पुण्यात येत. पार्किंगमधील महागड्या दुचाकींचे लॉक तोडून चोरलेली दुचाकी बीड, धुळे, नाशिकला घेऊन जात. 

मेसेंजरवरून ग्राहकांशी संभाषण 

चोरलेल्या वाहनविक्रीबाबत सोशल मिडियावर जाहिरात द्यायची. त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ग्राहकाशी संपर्क साधायचा. ग्राहकाने तयारी दर्शविल्यानंतर फायनान्सची गाडी आहे, कागदपत्रे नंतर देतो, असे सांगत पंधरा ते वीस हजार रूपये घेऊन दुचाकीची विक्री करायची. त्यानंतर मेसेंजरवरून ग्राहकाशी झालेले संभाषण डिलीट करायचा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com