The work of Thackeray government is more permanent than that of BJP government: Gulabrao Patil | Sarkarnama

भाजप सरकारपेक्षा ठाकरे सरकारचे काम शाश्‍वत : गुलाबराव पाटील 

कैलास शिंदे 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

विरोधी पक्षाचे कामच आहे, विरोधात बोलणे; परंतु हेच विरोधी पक्षाचे लोक ज्यावेळी सरकारमध्ये होते, त्यावेळी त्यांनी हे प्रश्‍न कधीही सोडविले नाहीत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही.

जळगाव : भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारवर कितीही टीका करीत असेल, विरोधात आंदोलने करीत असेल; परंतु भाजपच्या युती सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारचे काम शाश्‍वत आहे.

तब्बल 83 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आता केवळ दोन हजार दोनशे कोटी रुपये द्यावयाचे असून शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी "सरकारनामा' शी बोलताना दिली. 

भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार विरोधात करीत असलेली टीका व आंदोलनाबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाचे कामच आहे, विरोधात बोलणे; परंतु हेच विरोधी पक्षाचे लोक ज्यावेळी सरकारमध्ये होते, त्यावेळी त्यांनी हे प्रश्‍न कधीही सोडविले नाहीत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही. संगणक केंद्रावर शेतकऱ्यांना आधार कार्ड घेऊन फेऱ्या मात्र माराव्या लागल्या. 

महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याचा आज राज्यातील 83 टक्के शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ झाला आहे. आता केवळ दोन हजार दोनशे कोटी रुपये द्यावयाचे आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे.

आज "कोरोना' सारख्या गंभीर परिस्थितीतून सरकार जात आहे. पैशांची अत्यंत अडचण असतानाही शेतकऱ्यांना सरकारने प्राधान्य दिले आहे. तोच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी सरकारच्या शाश्‍वत कामाचा हा पुरावा आहे, असे पाटील म्हणाले. 

विक्रमी कापूस खरेदी 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या वर्षी विक्रमी कापूस खरेदी केली असल्याचे सांगून गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना तब्बल 3500 रूपये क्विंटल भाव दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी केला आहे. तब्बल 94 लाख क्विटंल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तब्बल 15 हजार कोटी रूपयांची हमी दिली आहे.

मका खरेदीतही सरकारचा विक्रम आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे आमचे धोरण आहे, मात्र केंद्र सरकारने त्याबाबत मर्यादा दिली आहे. तरीही शेतकऱ्यांकडे असलेला मका खरेदीबाबत लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. 

दूधप्रश्‍नी केंद्राचे अडवणुकीचे धोरण 

शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे ही महाविकास आघाडीची भूमिका आहेत. "कोरोना' संसर्गाच्या लढाईत सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी केली, दुधाला मागणी नसतानाही त्याची भुकटी बनविली. आंतराष्ट्रीय बाजारात भुकटी विकण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असतानाच केंद्राने दुधाची भूकटी आयात करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे एक प्रकारे हे केंद्राचे अडवणुकीचे धोरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यापेक्षा केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्यांना सांगून दूध भूकटी आयात करण्याच्या धोरणात बदल करावा, असा टोला गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख