We rushed to the rescue, sitting in the house of the now frightened minister: Girish Mahajan | Sarkarnama

आम्ही भर पुरात मदतीला धावलो, सद्याचे घाबरलेले मंत्री घरात बसून : गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

मी मंत्री असतो तर राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमध्ये फिरून त्या ठिकाणी पाहणी करून आदेश दिले असते.

जळगाव : केरळमध्ये पूर आल्यावर राज्याचा मंत्री म्हणून मी स्वत:औषधी घेवून गेलो, कोल्हापूरच्या पुरात उतरून आपण स्वत:मदत केली, नाशिकच्या पुरातही आपण थेट त्या ठिकाणी जावून मदत केली,

शासनातर्फे मंत्री म्हणून आम्ही लोकांना धीर दिला, परंतु आज "कोरोना' रोगाची गंभीर परिस्थिती असतांना मुख्यमंत्री घरी बसून आहेत, 
तर मंत्री काय करताऐत हेच कळत नाही,

दुसरीकडे जनता मात्र थेट मरणाच्या दारात आहे. मुख्यमंत्र्यापासून तर सर्व मंत्री घाबरलेले असून ते जनतेला काय धीर देणार आणि यातून कसे बाहेर काढणार हाच गंभीर प्रश्‍न आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

"कोरोना'सारखी गंभीर परिस्थिती असतांना राज्याचे शासन काय करीत आहे,हेच कळत नाही, त्यामुळे जनताही आता हवालदिल झाली आहे. राज्यात मृत्यूचा आकडा वाढत आहे, तर संशयीतांची संख्याही वाढत आहे. 

"कोरोना'रूग्णांनी हॉस्पीटल फुल्ल झाले आहेत. आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशी स्थिती असतांनाही राज्यातील मुख्यमंत्री व इतर मंत्रीही निर्धास्त आहेत. घरात बसूनच ते नागरिकांना पाणी उकळून प्या, मास्क लावा, काळजी घ्या असा सल्ला देत आहेत. ही चित्र अत्यंत विदारक आहे.

मंत्री अमित देशमुख आहेत कुठे?
राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री कोण आहेत, ते कुणालाही माहित नाही.मंत्री अमित देशमुख आपल्या लातूरच्या घरात बसले आहेत. राज्यातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयात "कोरोना'ची गंभीर स्थिती असतांना हे मंत्री महोदय एकाही मेडिकल कॉलेजला साधी भेट देण्यासही गेलेले नाही.

मी मंत्री असतो तर राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमध्ये फिरून त्या ठिकाणी पाहणी करून आदेश दिले असते. परंतु या देशमुखांना जनतेची काळजी नाही, त्यांना आपले लातूरचे घरच सोडवत नाही. असे मंत्री असतील तर कसे होईल राज्याचे चितांच आहे?

"डिन'च्या बदल्याने साधणार काय?
राज्यातील प्रशासनाचा समन्वय नाही, त्यामुळे "कोरोना'चे रूग्ण वाढत आहेत, अशा स्थितीत मात्र मेडिकल कॉलेजच्या "डिन'च्या बदल्या केल्या जात आहे. तब्बल अर्धा डझन डिनच्या बदल्या या शासनाने केल्या आहेत. त्यांनी नेमके काय साधले हाच प्रश्‍न आहे.

कारण या बदल्या मेडिकल कॉलेजला चांगले काम व्हावे यासाठी नाही तर त्या मेडिकल कॉलेजला त्या डिनचे काम चांगले नाही म्हणून त्यांची दुसऱ्या मेडिकल कॉलेजला बदली केली.

 म्हणजे एकूण काय तर अकार्यक्षम अधिकारी दुसऱ्या ठिकाणी पाठविले म्हणजे त्याठिकाणीही हे अधिकारी रूग्णांची संख्या वाढविणार आहेत. त्यामुळे आजच्या राज्यातील शासन सैरभर झाले असून त्यांना काहीही सूचत नाही. त्यामुळे आज जनता वाऱ्यावर आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख