Thackeray government do the farmers welfare schemes closed : Girish Mahajan | Sarkarnama

शेतकरीहिताच्या योजना ठाकरे सरकारने थंड बस्त्यात टाकल्या : महाजन 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने थंड बस्त्यात टाकल्या आहेत. त्यामुळे आज राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. मका खरेदी आणि दुधाला त्वरीत भाव न दिल्यास महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

 

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना महाविकास आघाडी सरकारने थंड बस्त्यात टाकल्या आहेत. त्यामुळे आज राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. मका खरेदी आणि दुधाला त्वरीत भाव न दिल्यास महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

जामनेर (जि. जळगाव) येथे शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) दूध दरवाढ करावी, दूध भुकटीस निर्यात अनुदान द्यावे, तसेच मका खरेदी करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

जामनेर येथे आज आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रारंभी मोर्चा काढण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

गिरीश महाजन म्हणाले, "राज्यात सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार राज्यातील जनतेसह शेतकरी वर्गाला अपेक्षीत न्याय देऊ शकलेले नाही. शेतकरी-कष्टकरी जनतेच्या हिताच्या योजना होत्या, त्या सर्व योजना जळगाव जिल्ह्यात थंड बस्त्यात टाकून बंद करून टाकल्या आहेत. मका-कापूस खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडला आहे. शेततळे, पाणी पुरवठ्यासारख्या योजनाही बंद केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर बि-बियाणे, खते देण्याची योजना फेल झाली आहे.'' 

एकीकडे बोगस बियाणे तर दुसरीकडे पाहिजे ती खते शेतकऱ्यांना मिळत नाही. दूध उत्पादक शेतकरीही बेजार झाला आहे. लकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही, तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात या पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, नवल पाटील, चंद्रशेखर काळे, बाबूराव घोंगडे, राजधर पांढरे, अमर पाटील, गोविंद अग्रवाल, अनिस केलेवाले, डॉ. प्रशांत भोंडे, रवींद्र झाल्टे, महेंद्र बावीस्कर, आतीष झाल्टे, संजय देशमुख, तुकाराम निकम, नजीम शेख, अरविंद देशमुख, आनंदा लाव्हरे, स्वीय सहायक संतोष बारी, दीपक तायडे, बाबूराव हिवराळे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख