तेव्हा तुम्ही काय नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आमदार सातपुतेंचा खडसेंनी घेतला समाचार - Rohini Khadse criticizes Ram Satpute for accusing Eknath Khadse on corruption's Allegations | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

तेव्हा तुम्ही काय नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आमदार सातपुतेंचा खडसेंनी घेतला समाचार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

श्यामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली?

जळगाव  ः ‘‘एकनाथ खडसे हे जर पैसे खात होते, तर ज्या वेळी तुमची सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही. तुम्ही काय तेव्हा नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? असा सणसणीत टोला अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांना लगावला आहे.

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये, अशी टीका त्यांनी केली होती.  

एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, नाथाभाऊ आपण आयुष्भर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केले नाही आणि देवेंद्रभाऊबदल बोलत आहात. विरोधी पक्षनेते असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेन्द्रजीवर बोलण्याअगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.

त्याला एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अधक्षा  अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, खडसे जर पैसे खात होते, तर मग सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिम्मत तर सिद्ध करा ना? श्यामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे 

महाराष्ट्रावर ज्या वेळी संकट येते, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हातात हात घालून संकटाचा सामना करतात. हीच आपली परंपरा आहे, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सद्या जो कुत्र्या मांजराचा खेळ करत आहेत, तो त्यांनी खेळू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

ते म्हणाले होते की, राज्यात  कोरोनाकाळात विरोधी पक्ष घेत असलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे की, ज्या वेळी राज्यावर संकट आले, त्या वेळी सर्वांनी एकत्र येवून काम केले आहे. किल्लारीचा भूकंप असो की, मुंबईतील बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांच्या वेळी राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी, विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून संकटाचा सामना केला. त्या कालखंडात मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षाचा नेताही होतो. मात्र अशा संकटाच्या समयी आम्ही असा कुत्र्या मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस सध्या जे करतायेत ते एका विरोधी पक्ष नेत्यांकडून अपेक्षित नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख