नाशिक जिल्हा परिषदेच्या रक्तदान उपक्रमाचे राज्यभर होतेय कौतुक - Nashik Zilla Parishad Blood Donation Camp Being Appreciated along the State | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक जिल्हा परिषदेच्या रक्तदान उपक्रमाचे राज्यभर होतेय कौतुक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 जून 2020

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पुढाकाराने झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, सदस्यांच्या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाची शासनाने विशेष दखल घेतली आहे. आज प्रकाशित झालेल्या शासनाच्या उपक्रमांच्या जाहिरातीत त्याचा ठळक उल्लेख करून राज्यभरातील आदर्श उपक्रम म्हणून त्याला गौरविण्यात आले आहे. 

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे राज्यभर रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पुढाकाराने झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, सदस्यांच्या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाची शासनाने विशेष दखल घेतली आहे. आज प्रकाशित झालेल्या शासनाच्या उपक्रमांच्या जाहिरातीत त्याचा ठळक उल्लेख करून राज्यभरातील आदर्श उपक्रम म्हणून त्याला गौरविण्यात आले आहे. 

देशातील महत्त्वाचे व प्रमुख, औद्योगिक, व्यावसायिक राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. अर्थात, त्यामुळे जगभरातून येणाऱ्या नागरिक, पर्यटक व प्रवासी यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही येथे मोठी आहे. त्यावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले. गेले अडीच महिने राज्यात लॉकडाउन सुरू आहे. संचारबंदी लागू करण्यात आली. 

त्यामुळे राज्यातील बहुतांश मोठ्या शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्तपेढ्या, रुग्णालयांचे काम बंद असल्याने रक्ताची टंचाई होती. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी रक्तदानाचे उपक्रम करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अनेक नागरिकांनी रक्तदानाचे उपक्रम केले.

यामध्ये नाशिकच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पुढाकाराने परिषदेच्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत ४ जूनला रक्तदान शिबिर झाले. त्यानंतर राज्यभर विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींचे वाढदिवस आदी उपक्रमांतून रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. रक्ताच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विविध घटक झटत आहेत. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, सभापती सुरेखा दराडे, अश्‍विनी आहेर, संजय बनकर, सुशीला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विविध अधिकाऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनीही या रक्तदानाच्या शिबिरासाठी प्रशासनाचे अभिनंदन केले होते. असे उपक्रम राज्यभर घेतले जावेत, यासाठी त्याचे छायाचित्र आज प्रकाशित झालेल्या राज्य शासनाच्या रक्तदान उपक्रमाच्या जाहिरातीत उल्लेखनीय कार्य म्हणून समाविष्ट केले आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख