मनसे वर्धापन दिन विशेष : जिल्ह्यात सात वर्षापासून मनसेला पदाधिकारी नियुक्तीची प्रतीक्षा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्यात युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते.
Raj Thackeray .jpg
Raj Thackeray .jpg

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्यात युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते. मात्र, कालांतराने जिल्ह्याकडे लक्ष न दिल्याने पक्ष आज अस्तित्वहिन झाला आहे. सात वर्षापासून तर जिल्हात पदाधिकारी नियुक्तीच करण्यात आलेली नाही.

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. सेनेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्यासारखा तडफदार नेता मनसेला मिळाला. त्यावेळी पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे यांनी स्वतः जळगाव जिल्ह्याचा दौरा करून सभा घेतल्या होत्या. यानंतर जिल्ह्यात संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे पक्षाचे कार्य वेगात सुरू होते. इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. जिल्ह्यातील अमळनेर पंचायत समिती सभापती पदी डॉक्टर दिपक पाटील यांची निवड झाली होती. 

पाटील हे राज्यातील पक्षाचे पहिले सभापती ठरले होते. पक्षाने जळगाव महापालिकेची निवडणुक ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. त्यामध्ये तब्बल १३ नगरसेवक विजयी झाले होते. महापौर निवडणुकीत पक्षाची भूमिका महत्वाची ठरली होती. पुढे ललित कोल्हे महापौर झाले होते. पक्षाने २०१४ मध्ये जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली मात्र, पक्षाला यश मिळाले नाही. परंतु काही मतदार संघात चांगली मते मिळाली होती. पक्ष चांगला बळकट होत असताना राज्यातील नेतृत्वाने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. 

त्यामुळे निवडणुकीच्या काळात पक्षात आलेले अनेक जण पक्ष सोडून गेले. महापालिकेतील पक्षाचे नेते व नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे सन २०१९ मध्ये महापालिका निवडणुकीत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात कोणतीही पालिकेत पक्षाचा नगरसेवक नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी तर पक्षाचे अस्तित्व नाही. गेल्या सात वर्षांपासून पक्षाला जिल्हाप्रमुख नाही. प्रदेश नेते व माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस अॅंड. जमिल देशपांडे हे पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नावर ते आंदोलन करीत असतात. 

पतसंस्थेतील ठेवीदारांच्या प्रश्ना वर त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले होते. मात्र, त्याचा फायदा पक्षाला घेता आला नाही. गेल्या सात वर्षांत पक्षाचा मोठा नेता जिल्ह्यात आला नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात पक्ष कार्यकारिणी नाही. नेते अॅंड. जयप्रकाश बाविस्कर संपर्क ठेऊन आहेत. मात्र, इतर कोणतेही नेते लक्ष देत नाही. त्यामुळे आज जिल्ह्यात पक्षाचे फारसे अस्तित्व दिसत नाही. जर प्रदेश नेत्यांनी लक्ष घातले तर आजही पक्षाला युवकांची साथ मिळू शकते. वर्धापन दिनी प्रदेश नेत्यांनी हा संकल्प करावा. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com