मी शिवसेनेचा सोंगाड्या; उन्मेष पाटलांना कसे नाचवायचे, हे मला चांगलेच माहीत  - Minister Gulabrao Patil criticizes MP Unmesh Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मी शिवसेनेचा सोंगाड्या; उन्मेष पाटलांना कसे नाचवायचे, हे मला चांगलेच माहीत 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

ज्या पक्षात फाटाफूट झाली आहे. तो पक्ष काय ताकद दाखविणार?

जळगाव : भारतीय जनता पक्ष मोर्चा काढून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे; परंतु मोर्चा काढणे हे त्यांचे काम नाही. ज्या पक्षात फाटाफूट झाली आहे. तो पक्ष काय ताकद दाखविणार? असा परखड प्रश्‍न शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी आज (ता. 6 नोव्हेंबर) जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची आढावा बैठक झाली. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थितीत होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव येथे सोमवारी (ता. 9 नोव्हेंबर) राज्य सरकारविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात भाजप आपली ताकद दाखविणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, की मोर्चा काढण्याची भाजपची ताकद नाही, त्याला शिवसेनेचा वाघच लागतो. भारतीय जनता पक्षात आता फूट पडली आहे, ज्या पक्षात फाटाफूट झाली आहे. तो पक्ष आपली काय ताकद दाखवू शकणार आहे, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्यापेक्षा दिल्लीत आपले सरकार आहे. पंतप्रधानांकडून शेकऱ्यांचे प्रश्‍न सोडवून आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

...तर उन्मेष पाटलांनी राजीनामा द्यावा 

जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. "शिंगाडा मोर्चा काढणारे आता शांत झाले आहेत,' असे खासदार पाटलांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, "मी शिवसेनेचा सोंगाड्या आहे, त्यामुळे विरोधकांना कसे नाचवायचे, हे मला चांगले माहीत आहे. आगामी काळात भाजपच्या खासदारास मी नाचविणार आहे. खासदार पाटील यांच्यात खरेच ताकद असेल तर त्यांनी दिल्लीतून शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडवून आणावा. तसे झाले तर आपण राजीनामा देवू; अन्यथा त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हानही त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले. 

भाजपने स्वप्ने पहावीत 

भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असे कायम म्हणत असतात. त्याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले, की राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. त्यांचे "मुंगेरीलाल के हसीन सपने' असून त्यांनी ती पाहत राहावीत, असा टोला त्यांनी लगावला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख