धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) रात्री धुळे शहरातील केशरानंद लॉन्स येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या पक्षवाढीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विदर्भातील गडचिरोलीपासून आपल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना काही ठिकाणी पक्षांतर्गत वादही उफाळून आल्याचे दिसून आले आहे.
जयंत पाटील यांचा हा दौरा आज धुळ्यात पोचला. ते रात्री धुळ्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. या संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, धुळ्यात त्यांना वेगळाच अनुभव आला. या ठिकाणी माजी आमदार गोटे आणि किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा वादच त्यांना पाहावा लागला.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भूषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यामुळे अनिल गोटे आणि किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच वाद सुरू झाला. या वादामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

