मंदिराच्या भूमिपूजनासाठी पवार-ठाकरेंची परवानगी घेतली का? गृहमंत्री देशमुख म्हणाले...  - Did Pawar-Thackeray get permission for Bhumi Pujan of the temple? Home Minister Deshmukh said ... | Politics Marathi News - Sarkarnama

मंदिराच्या भूमिपूजनासाठी पवार-ठाकरेंची परवानगी घेतली का? गृहमंत्री देशमुख म्हणाले... 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. 

जळगाव : मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली का? असा खोचक सवाल भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्‌विटरद्वारे विचारला होता. त्याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला असता, त्यावर उत्तर देण्यास गृहमंत्री देशमुख यांनी टाळाटाळ केली. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज (ता. 1 नोव्हेंबर) नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्‍यातील खेतिया येथील श्री विष्णूनारायणपूरम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. देशमुख यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमित्त साधून मंदिर उघडण्याबाबत प्रचंड आग्रही असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून गृहमंत्री देशमुख यांना खोचक सवाल केला होता. 

त्यात त्यांनी म्हटले होते की, शहाद्यातील मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली का, असा प्रश्‍न विचारला होता. 

कार्यक्रमानंतर पत्रकारांनीही आचार्य भोसले यांचा हाच प्रश्‍न गृहमंत्री देशमुख यांना विचारला, तेव्हा त्यांनी त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही. उत्तर देण्यास देशमुखांनी टाळाटाळ केली. 

या पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर मात्र टिका केली. ते म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे काम करीत आहे. त्यामुळे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. 

या वेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना देशमुख यांनी सांगितले की, राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. अगदी समन्वयाने कामकाज सुरू आहे. तीनही पक्षाचे नेते एकत्रित येऊन निर्णय घेतात. परंतु भाजपच्या नेत्यांची पायाखालची वाळू आता घसरायला लागली आहे. विरोधी पक्ष या ना त्या अफवा पसरवत आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. प्रत्येक पक्षात गटबाजी असते, परंतु या गटबाजीला थारा न देता पक्षवाढीसाठी सगळ्यांनी एकत्रित काम सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. 

 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख