जनतेच्या सहकार्याशिवाय कोरोनाचा अटकाव शक्य नाही : छगन भुजबळ - Corona Can be Controlled through Peoples help Say Chagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

जनतेच्या सहकार्याशिवाय कोरोनाचा अटकाव शक्य नाही : छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

जगभरात कोरोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट सुरू झाली आहे मात्र आपल्या देशात कोरोनाची पहिली लाट अजून संपलेली नाही. जनतेच्या सहकार्याशिवाय कोरोनाचा अटकाव शक्य नाही. असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा  व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : जगभरात कोरोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट सुरू झाली आहे मात्र आपल्या देशात कोरोनाची पहिली लाट अजून संपलेली नाही. जनतेच्या सहकार्याशिवाय कोरोनाचा अटकाव शक्य नाही. असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा  व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी येवला येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, येवला औद्योगिक सहकार वसाहत मर्यादितचे अध्यक्ष भोलानाथ लोणारी, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कुठलीही तडजोड केली नाही. आरोग्याच्या जेवढ्या काही सोयी सुविधा करता येतील अशा कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे असून आरोग्य यंत्रनेला बळकटी देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. लस येईल तो पर्यंत मास्क आपल्यासाठी महत्वाची लस आहे.

प्रत्येक जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला नाही तर ४ जानेवारीपासून नियमित शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू; पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या. कोरोनाच्या अटकाव करण्यासाठी प्रशासनाने योग्य मेहनत घेतली आहे.

येवला शहर आणि परिसरात २००४ पासून अनेक योजना आखल्या. त्याची पूर्तता केली असून अद्यापही अनेक कामे सुरू आहे. ५४ कोटी रुपयांच्या भूमिगत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले असून लवकरच हे काम सुरू होऊन शहरातील सर्व गटारी भूमिगत होतील.

येवला तालुक्यात कृषी पूरक उद्योग आणि पैठणी उद्योग अतिशय महत्वाचे आहे. यात प्रामुख्याने मका, कांदा यांवर आधारित पूरक उद्योग आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये या संबंधित उद्योग उभे राहत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. चिचोंडी येथे उभारत असलेली औद्योगिक वसाहत ही या उद्योगांना भरारी देण्याचे काम करेल. स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल. अंगनगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित यांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.यावेळी खासदार डॉ.भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज येवले औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. येवले यांचे फंडातून बांधलेले प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच येवला नगरपालिका हद्दीतील शासनाचे वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलितोत्तर विकास योजने अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख