भाजप खासदार रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र; म्हणाल्या...  - BJP MP Raksha Khadse's letter to Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

भाजप खासदार रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र; म्हणाल्या... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 12 मे 2021

कोरोनाच्या महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

जळगाव : राज्यातील बार व हॉटेल मालकांची ज्या प्रमाणे तत्काळ दाखल घेतली त्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांचा प्रश्न सोडवावा, असे पत्र भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना पाठविले आहे. खासदार रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या ( BJP) खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या त्या सून आहेत. (BJP MP Raksha Khadse's letter to Sharad Pawar)

शरद पवार (Eknath Khadse) यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ''गेले वर्षभर कोरोनाच्या महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही, जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे, बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे'', असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : तव्येतीची विचारपूस केली अन् अमरसिंहांनी जिल्ह्याच दुखणंही पवारांच्या कानी घातलं...
 

''शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी सरकारकडून काही काळाची सवलत मिळावी यासाठी शरद पवार यांनी पाठपुरावा करावा. तसेच बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील विजेच्या संकटात सापडला असून, वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही.

शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता''. (BJP MP Raksha Khadse's letter to Sharad Pawar)

हे ही वाचा : चंद्रकांतदादांची माया कुठंय ते मला माहितीय; हसन मुश्रीफांचा इशारा
 

''टाळेबंदीच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे. राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांस मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा'', अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

''दूध, द्राक्षे, कांदा, भाजीपाला, केळी, आंबे, फळे, फुले आदी शेतमालाच्या बाजारपेठा टाळेबंदीमुळे बंद झाल्याने दररोजच्या उत्पन्नास शेतकरी मुकला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्जमुक्तीची घोषणाही सध्या वाऱ्यावर आहे. तरी ज्याप्रमाणे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली, त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्याच्या कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यानात्याने त्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहचवून या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु दिलासा द्यावा'', अशी विनंती रक्षा खडसे यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख