मुंडेंवरील आरोप गंभीर, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- गिरीश महाजन  - Allegations against Munde are serious, he should resign from the ministry - Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडेंवरील आरोप गंभीर, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप महिलेने केले आहेत. त्यामुळे  त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 

जळगाव : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप महिलेने केले आहेत. त्यामुळे  त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी गिरीश महाजन आलेले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपाबाबत बोलतांना महाजन म्हणाले. की, धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्याबाबत त्यांनी स्वतः आपले दुसरे कुटुंब असल्याबाबत मान्य केले आहे.

आपल्याला दोन मुले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा वेगळ्या चौकशीचा विषय आहे. याबाबत भाजपने देखील चौकशीची मागणी केली आहे. मुंडेंनी माहिती दडवल्याबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. मुंडेंवर गंभीर आरोप असल्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी केल आहे. तीच आपली अपेक्षा आहे. 

जावई दोषी असतील कारवाई व्हावी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. यावर मत मांडताना गिरीश महाजन म्हणाले की, जावई कोणाचे तो विषय नाही. पण त्याठिकाणी ते खरच दोषी असतील किंवा त्यांच्या विरोधात काही पुरावे सापडले असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गंभीर गुन्हा असल्याने ती एजन्सी तपास करेल. त्यात काही तथ्य असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख