शिरपूर पॅटर्नचे बंधारे बनले रोजगार निर्मितीचे पायलट प्रोजेक्‍ट 

देशात पथदर्शी ठरलेला आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यासाठी "दुष्काळमुक्तीचा मंत्र' म्हणून नावारूपास आलेल्या जलसंधारणाच्या "शिरपूर पॅटर्न'च्या माध्यमातून हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली. पाठोपाठ या बंधाऱ्यांतून आता रोजगारनिर्मितीही होणार आहे.
Shirpur pattern dams became a pilot project for job creation
Shirpur pattern dams became a pilot project for job creation

शिरपूर : देशात पथदर्शी ठरलेला आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यासाठी "दुष्काळमुक्तीचा मंत्र' म्हणून नावारूपास आलेल्या जलसंधारणाच्या "शिरपूर पॅटर्न'च्या माध्यमातून हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली. पाठोपाठ या बंधाऱ्यांतून आता रोजगारनिर्मितीही होणार आहे. शिरपूर पॅटर्नमधील बंधाऱ्यांत मत्स्यशेतीला सुरुवात होत असून खवय्यांना चविष्ट माशांची पर्वणी लाभणार आहे. या उपक्रमामुळे "शिरपूर पॅटर्न' पुन्हा लक्षवेधी ठरला आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात आंबे (ता. शिरपूर) येथील शिरपूर पॅटर्न बंधारा दुथडी भरला आहे. या बंधाऱ्यात मत्स्यशेतीचा "पायलट प्रोजेक्‍ट' राबवला जात आहे. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते सोमवारी (ता. 13 जुलै) बंधाऱ्यात मत्स्यबीज सोडण्यात आले. पाठोपाठ पावसाचे पाणी टिकून असलेल्या शिरपूर पॅटर्नच्या सर्व बंधाऱ्यात मत्स्यबीज टाकण्यात येणार आहे. 


मत्सशेतीतून रोजगार निर्मिती 

बंधाऱ्यांमधील अनुकूल जागेत 21 दिवसांची वाढ झालेले मत्स्यबीज सोडण्यात येते. योग्य खाद्य मिळाल्यास माशांचे वजन सुमारे सात महिन्यानंतर किलोभर भरते. त्यानंतर ते काढणी योग्य होतात. शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांसाठी नाल्याकाठची शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात मासेमारीसाठी परवानगी दिली जाईल. या शेतकऱ्यांमध्ये बहुतांश आदिवासींचा भरणा आहे. त्यांना चविष्ट माशांच्या विक्रीतून हक्काचे उत्पन्नाचे साधन गवसणार आहे. त्यामुळे शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून शेती, पशुपालनासोबत मत्स्यशेतीचा पूरक व्यवसायही ग्रामीण भागात ठळक रोजगारनिर्मिती करणार आहे. 


तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रकल्प 

मत्स्योत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांशी दीर्घकाळ चर्चा करून बंधाऱ्यांच्या क्षेत्रात मत्स्य व्यवसायाचे नियोजन करण्यात आले. कटला, रोहू व मृगळ या खास गोड्या पाण्यातील भारतीय माशांसह कोंबडा (स्कॉर्पिअन फिश) जातीचे मत्स्यबीज उपयोगात आणले जात आहे. कटला मासा पाण्याच्या पृष्ठभागावर, रोहू मासा मध्यम स्तरामधील तर मृगळ तळभागावरील प्राणी प्लवंग व अन्य खाद्य घटक खात असल्यामुळे या तीनही जाती सहजीवनासाठी परस्परपूरक ठरतात. या मिश्र मत्स्यशेतीमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. 


शिरपूर पॅटर्नचे फायदे 

शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमुळे तालुक्‍यातील 12 हजार हेक्‍टरावरील क्षेत्र ओलिताखाली आले. नाल्यांच्या खोलीकरणादरम्यान निघालेला सुपीक गाळ काठावर पसरला. त्यामुळे नाल्याकाठची ओसाड जमीन लागवडी योग्य बनून बंधाऱ्यांमुळे बागायती झाली. विहिर नसलेल्या शेतकऱ्यांना माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी स्वखर्चाने डिझेल इंजिन्स उपलब्ध करून दिली आहेत. बंधाऱ्यांच्या कामातून मिळालेल्या मुरमामुळे तालुक्‍यात शेतापर्यंत जाणारे 50 किलोमीटर अंतराचे रस्ते तयार झाले आहेत. सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे शेती बागायती झाल्याने तेथील शेतकऱ्यांची वित्तीय संस्थांतील पत वाढली असून एकेकाळी पडीक असलेल्या शेतीचा एकरी भावदेखील वधारला आहे. आता मत्स्यशेतीमुळे शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन खुले होत आहे. 

बंधाऱ्यांची माहिती

बंधाऱ्यांची एकूण संख्या  240
ओलिताखालील क्षेत्र  12 हजार हेक्‍टर

बंधाऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ

लांबी 70900 मीटर
रुंदी 4880 मीटर
खोली 1096 मीटर

शेतकरी सुखी व्हावा; म्हणून जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचे जनक अमरीशभाई पटेल यांनी बंधाऱ्यातील पाणी शेतापर्यंत पोचवले. शेती बारमाहीचा संकल्प आहे. मत्स्योत्पादनातून गरजू शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मितीचा प्रयत्न सुरु आहे. या कामात शेतकऱ्यांची साथ मोलाची ठरली. आगामी पाच वर्षात आणखी 100 बंधारे बांधून पूर्ण करण्याचे नियोजन असून काही कामांना सुरुवात झाली आहे. 

-भूपेशभाई पटेल, अध्यक्ष, प्रियदर्शनी सूतगिरणी, शिरपूर 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com