ड्रायव्हर पॉझिटिव्ह आल्याने मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त होतात का? खोसकरांचा सवाल

माझ्या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ मला कोरोना झाला असे नाही. मुख्यमंत्र्यांच्या चालकांचाही अहवाल पॉझिटिव्ह होता, याचा अर्थ मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त आहेत असे नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेऊ नका, असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे
I am not Corona Positive Say Hiraman Khoskar
I am not Corona Positive Say Hiraman Khoskar

नाशिक : गेले आठवडाभर येथील आमदार हिरामण खोसकर हे कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याची चर्चा होती. मात्र त्यांचा संपर्क होत नव्हता. या पार्श्‍वभूमीवर आजे आमदार खोसकर यांनी स्वतः पुढे येऊन खुलासा केला आहे. ते म्हणाले, "माझ्या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ मला कोरोना झाला असे नाही. मुख्यमंत्र्यांच्या चालकांचाही अहवाल पॉझिटिव्ह होता, याचा अर्थ मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त आहेत असे नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेऊ नका,'' 

इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर तीन दिवसांपूर्वी नाशिक बाजार समितीच्या संचालकांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी बाजार समितीच्या एका संचालकासह काहींना कोरोना झाल्याचे आढळले, अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे या संचालकांसह आमदार खोसकर यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. या कालावधीत त्यांचा संपर्क देखील होत नव्हता. त्यामुळे अनेक राजकीय कार्यकर्ते, नेते त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चेचे चर्वण करीत होते.

शेतीची कामे करताना दिसले खोसकर

या पार्श्‍वभूमीवर आज आमदार खोसकर आपल्या शेतात मशागत करतांना आढळले. त्यांच्याशी संपर्क केला असता, ''मी ठणठणीत आहे. पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे करीत आहे. शेतात आज सरी पाडायचे काम सुरु आहे. उद्यापासून मका पेरण्याचे काम करणार आहे. रोज अनेक लोक संपर्क करीत आहे. कार्यकर्ते भेटत आहेत. त्यांच्याशी बोलतो आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागीरकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. मी ठणठणीत आहे. एकदम चांगला आहे. मला कोरोना झालेला नाही,'' असे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी माझा ड्रायव्हर मंगेश जावळे याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेच मी त्याला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. रोज मी त्याच्याशी बोलतो आहे. त्याची प्रकृती देखील उत्तम आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यावर मी त्याला कुठेही घेऊन गेलेलो नाही. त्याच्यासोबत प्रवास केलेला नाही. त्यानंतर मी मंत्री धनंजय मुंडे पॉझिटिव्ह आल्याने त्यांची सदिच्छा भेट घेण्यास गेलो होतो. ते देखील पुरेसे सोशल डिस्टन्स ठेऊन मी त्यांच्याशी बोललो. त्यामुळे लोकांनी अफवा पसरवू नये. कोणीही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये." अहो, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचा कोविड १९ चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कोरोना झाला असा होतो का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजकीय चर्चेला मिळणार विराम

या निमित्ताने गेले आठवडाभर नाशिक बाजार समिती व तेथील संचालक मंडळातील सदस्य कोविड १९ पाॅझिटिव्ह असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. त्याला पूर्णविराम मिळेल. बाजार समितीचे एक संचालक यापूर्वी पाॅझिटिव्ह होते. येथील व्यापारी तसेच कामगार देखील कोरोनाग्रस्त आढळले. त्यातून बाजार समितीच्या परिसरात अनेकांना त्याची लागण झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे. या भाग सध्या सील करम्यात आला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com