शिरपूरच्या गांजाशेतीत भाजपचे आमदार-खासदार : मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून चौकशीची गोटेंची मागणी  - BJP MLA-MP joins Shirpur cannabis farm : Anil Gote | Politics Marathi News - Sarkarnama

शिरपूरच्या गांजाशेतीत भाजपचे आमदार-खासदार : मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून चौकशीची गोटेंची मागणी 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

गांजा उत्पादनासाठी तब्बल दीड हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र वापरले जात आहे.

धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिरपूर तालुक्‍यामध्ये पोलिस प्रशासनाच्या कृपा आशीर्वादामुळेच गांजा उत्पादक शेतकरी पोसले जात आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करत राज्य सरकारच्या गृह विभागाला घरचा आहेर दिला आहे. 

मुंबई येथील बहुचर्चित ड्रग्ज कनेक्‍शनशी शिरपूरचा काही संबंध आहे का? याचाही राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणीदेखील माजी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिरपूरच्या गांजाशेती प्रकरणाची चौकशी केली असता भाजपचे सत्य बाहेर येईल, असे म्हणत गोटे यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते गोटे यांनी आज (ता. 23 नोव्हेंबर) धुळ्यात पत्रकार परिषद घेत खास आपल्या शैलीत आरोपांची राळ उवून दिली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यामध्ये गांजा उत्पादकांना पोलिस प्रशासनाचेच सुरक्षा कवच असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पोलिस अधिकाऱ्यांसोबतच तलाठी, प्रांताधिकारी, त्याचबरोबर सर्कल (मंडलाधिकारी) आदी अधिकारीदेखील गांजामाफियांना सामील असल्याचे सांगितले. त्यामुळेच गांजा उत्पादनासाठी तब्बल दीड हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र वापरले जात आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोटही गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 

या गांज्याच्या रॅकेटमध्ये भाजपचे आमदार, खासदार, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य देखील सामील आहेत, असा खळबळजनक आरोप करत या सर्व गांज्या प्रकरणाच्या रॅकेटचे खापर माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या माथी फोडले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख