BHR गैरव्यवहारात मोठे नेते; मला नावे माहीत आहेत : खडसेंचा रोख कोणाकडे?  - Big leaders in BHR fraud ; I know the names : Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

BHR गैरव्यवहारात मोठे नेते; मला नावे माहीत आहेत : खडसेंचा रोख कोणाकडे? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

चौकशीत त्यांच्यावर कारवाई होईलच.

जळगाव  : "भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी झालेला गैरव्यवहार हा तब्बल 1100 कोटी रुपयांचा आहे. त्यात मोठे राजकीय नेते अडकले असून पोलिस तपासात ही माहिती पुढे येईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल. आपल्याला ही नावे माहीत आहेत. परंतु चौकशीत बाधा येऊ नये; म्हणून आपण ती जाहीर करीत नाही,' असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. 

"बीएचआर' पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी सुरू असून यातील काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे तसेच या व्यवहारातील जमिनी खरेदी करणारे सुनील झंवर हे फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी खडसे हे पाठपुरावा करीत होते. याबाबतची माहिती देण्यासाठी त्यांनी आज (ता. 30 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. 

पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी झालेला गैरव्यवहार तब्बल अकराशे कोटींचा आहे असल्याचे सांगून खडसे म्हणाले, की महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

या गैरव्यवहारात मोठे राजकीय नेते अडकले असून पोलिस तपासात ही माहिती पुढे येईल. त्यांच्यावर कारवाई होईल. आपल्याला ही नावे माहीत आहेत; परंतु चौकशीत बाधा येवू नये; म्हणून आपण ती जाहीर करीत नाही. मात्र, चौकशीत त्यांच्यावर कारवाई होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे मिळाले पाहिजेत, या साठी आपला पाठपुरावा सुरू राहणार आहे, असे खडसे यांनी या वेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख