परब यांच्याविरोधातील तक्रारीनंतर आरटीओ अधिकाऱ्यांत भांडणे : तक्रारदाराचेही कारनामे चव्हाट्यावर

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील तक्रारीनंतर आरटीओमधील वाद पुढे येऊ लागले आहेत.
anil parab
anil parab

नाशिक : परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करून अचानक चर्चेत येऊन महाराष्ट्राचे दुसरे `परमबीर` ठरलेले आरटीओतील अधिकारी गजेंद्र पाटील कोण आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Where is RTO Gajendra Patil) परब यांच्याविरोधात नाशिक पोलिसांकडे तक्रार देऊन गायब झालेले पाटील कुठे आहेत, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

श्री. पाटील यांच्याविरोधात त्यांच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोशल मिडियातून आरोप केले आहेत. धुळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी याबाबत आपले अनुभव लिहिले आहेत. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. 

या पोस्टमध्ये म्हटले आहे, की एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाने पोलिस ठाण्यात ईमेलवर निराधार तक्रार केली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यावर ही तक्रार केली हे सुद्धा तेव्हढेच महत्त्वाचे आहे. त्यांचे निलंबन का झाले? कारण एका अधिकाऱ्याच्या मयत पत्नीबद्दल अतिशय आक्षेपार्ह व मानहानीकारक मजकूर असलेली पत्रके मध्यरात्री १२ वाजता धुळे कार्यालयात टाकण्यात आली. त्याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात मोहाडी (धुळे) पोलिसांत (६१/ २०२०) गुन्हा दाखल आहे. त्याच्या तपासाचा गोपनीय अहवाल पोलिस अधीक्षकांनी धुळे कार्यालयास व पुढे परिवहन आयुक्तांना सादर झाला. आयुक्तांनी तो शासनास सादर केला. त्यानुसार जानेवारी २०२१ महिन्यात सदर मोटार वाहन निरीक्षकाचे निलंबन झाले. त्यानंतर त्यांचे नाशिक हे मुख्यालय दाखविण्यात आले. 

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीमध्ये माझ्याबद्दल (श्री. कळसकर) दोन वैयक्तिक आरोप आहेत. जळगाव येथे २४०० बीएस-४ वाहन नोंदणींमध्ये प्रत्येकी १२,००० रुपये  घेतले. हा एक आरोप आहे. हे शंभर टक्के खोटे आहे. त्याचा अहवाल कार्यालयास सादर केलेला आहे. संगणकावर `वाहन ४` प्रणालीवर तो देशभर उपलब्ध आहे. त्यातील सत्य बाहेर येईल, शिवाय धुळे आरटीओ हे जळगाव  कार्यालयाचे नोंदणी अथवा अपिलीय अधिकारी आहेत का? त्यातच सर्व आले. 

दुसरा भाग बदल्यांचा. धुळे अथवा नाशिक या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बदलीचे अधिकार नाहीत. मी कोणाची बदली केली?. कुठे केली? कोणाकडे शिफारस केली? कमीत कमी एका अधिकार्‍याचे नाव तरी सांगावे, हे माझे आव्हान आहे. हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.

मोहाडी पोलिसांतील गुन्हा
मोहाडी पोलिस ठाण्यात १३ जुलै २०२० या दिवशी कोरोनाच्या महामारीत  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला? तो काय गुन्हा आहे? संशयीत आरोपी कोण आहे?यापुर्वी संशयीतांनी असे गुन्हे केले आहेत का? ही त्याची पाहिलीच  वेळ होती का? पूर्वी किती वेळा आणि कोणत्या अधिकाऱ्यांबद्दल असे केले आहे? तो हे का करतोय?त्याला काय मिळवायचे आहे. ज्यांच्या पत्नीच्या बाबतीत बदनामीकारक पत्रके वाटली जातात, ते कोणत्या जातीचे आहेत? त्यांच्यावरच का केले जातेय हे? याची खोलवर माहिती घेतली तर  वस्तुस्थिती  बाहेर  येइल,  असे  मला  वाटते? असे त्यात म्हटले आहे. 

मराठा- वंजारी वादाला फोडणी
या निनावी तक्रारीमध्ये मराठा - वंजारी आंतरजातीय विवाहाचा, उच्च अधिकाऱ्यांना चुकीची उपमा देऊन द्वेषपूर्वक उल्लेख व उपमर्द केला आहे. हेतूपुरस्सर सामाजिक तेढ निर्माण करण्यात येत आहे. यात विभागाची आणि  अधिकाऱ्यांची वैयक्तिक बदनामी करायची आहे. महिलांचे इतके चारित्र्यहनन आणि ते सुद्धा हयात नसल्यावर केले जात आहे. असे चारित्र्यहनन की जे न्यायालयात कोणताही वकील खुलेपणाने वाचू शकत नाही. हे सहन न झाल्याने यावर कारवाई करायची की नाही? याबाबत औरंगाबाद खंडपीठात खटला झाला व त्यात मी स्वतः सहभागी झालो.

अब तक ५८ !
प्रशासकीय कर्तव्याचा भाग म्हणून मी गेल्या ३ वर्षात  धुळे  कार्यालयातील तिघांना निलंबित आणि ५ कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केली आहे, असे कळसकर यांनी त्यात म्हटले आहे. माझ्या सेवा कार्यकाळात आजवर २६ वर्षात ५८ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत. त्यातीलच हा एक गुन्हा आहे. त्यामुळे मला भिती, दडपशाही व माझ्याविरोधात चार महिने धेळे येथे आंदोलन केले. मला माफिया, तोतया ईडी आयुक्त म्हणून फोन केले गेले. जमिनीचे उतारे काढून तक्रारी केल्या. चौकशीच्या धमक्या दिल्या.  मात्र मी माघार गेतली नाही. त्यामुळेच या आणखी एका तक्रारीची भर पडली आहे. माझ्यावर असे कितीही खोटे आरोप केले गेले, कितीही बदनामीचा प्रयत्न झाला तरी गैरकारभार व अपप्रवृत्तीना शिक्षा केल्याशिवाय थांबणार नाही. माझी नोकरी गेली तरी बेहत्तर, गुन्हेगारी वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच!`

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com