पोलीस अधिकाऱ्याच्या निधनाची पसरवली अफवा...मात्र कोरोनावर केली यशस्वी मात - Some one Spread Rumor about the death of Police Officer from Malegaon | Politics Marathi News - Sarkarnama

पोलीस अधिकाऱ्याच्या निधनाची पसरवली अफवा...मात्र कोरोनावर केली यशस्वी मात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

निधनाची वार्ता पसरवली गेली त्याने अजूनच खचलो परंतु माझ्यातील सज्ञान असल्यामुळे मी कोरोनाच्या आजाराला चितपट केले व त्या अफवांच्या चर्चेवर विजय मिळवला आहे. ज्यांच्याविषयी ही अफवा पसरली

नाशिक : माझ्या निधनाची वार्ता पसरवली गेली त्याने अजूनच खचलो परंतु सज्ञान असल्यामुळे मी कोरोनाच्या आजाराला चितपट केले व त्या अफवांच्या चर्चेवर विजय मिळवला आहे. ज्यांच्याविषयी ही अफवा पसरली त्या आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ साबळे आपले मनोगत व्यक्त करत होते.

ते म्हणाले, ''माझी नेमणूक आडगाव पोलीस स्टेशनला नाशिक नियंत्रण कक्ष होती. नेमणुकीस असताना एप्रिलमध्ये मालेगावला बंदोबस्तासाठी पॉझिटिव्ह एरियात ड्युटी लागली. नेहरू नगर, मच्छी मार्केट, आझाद नगर मध्ये सेक्‍टरला चेकिंग अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली होती. नाईट ड्युटी वर असताना कर्मचारी चेक करणे हे काम मी करत होतो. काही दिवसांनी माझ्या समोरून काही लोक मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसले. एका सहकार्याने मला सांगितलं साहेब हा मृतदेह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आहे. माझं वय सत्तावन्न वर्ष असल्यामुळे मला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. नेमून दिलेल्या ठिकाणी काम करत असताना मला खोकला आणि ताप जाणवू लागला. अप्पर पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या आजाराबद्दल तसेच ताप, खोकला येत असल्याचे सांगितले. मेडिकल रजेवर जाण्याबाबत विचारणा केली. तेव्हाची परिस्थिती इतकी भयानक होती की, मी पूर्ण घामाने ओलाचिंब झाला होतो. अप्पर पोलीस अधीक्षकांना विंनती करून एक अर्ज सादर केला. सटाणा येथे फॅमिली डॉक्‍टर यांच्याकडे उपचार सुरू केले. परंतु त्या उपचारांचा काही उपयोग झाला नाही.''

श्री. साबळे पुढे म्हणाले, ''कुटुंबियांच्या आग्रहाखातर मी मालेगावला कोरोनाची तपासणी केली. परंतु माझा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळत नव्हते. वारंवार विचारणा केली तेव्हा अशी माहिती मिळाली की तुम्ही निगेटिव्ह आहात. त्यामुळे तुमचा अहवाल अजून आला नाही. तरी मनात खूप धास्ती होती. मी पुन्हा फॅमिली डॉक्‍टर यांच्याकडे जाऊन होत असलेल्या त्रासाबाबत सांगितले त्यांनी पुन्हा तपासले व छातीचे एक्‍सरे काढले आणि सांगितले की तुम्हाला न्युमोनिया झाला आहे. त्या डॉक्‍टरांनी मला मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये रेफर केले. पण तिथे गेल्यानंतर मला योग्य वागणुक मिळाली नाही,''

मालेगावची दहशत

''मी पी एस आय आहे असे सांगितल्यावर तिकडून विचारणा केली जायची तुमच्या ड्युटीचा परिसर कोणता? मी मालेगाव सांगताच ते हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी धजावत नव्हते. पुन्हा शासकीय रुग्णालयात कुटुंबियासमवेत स्वॅंब देण्यासाठी गेलो परंतु तिथे स्वॅंब देण्यासाठी रांगाच रांगा होत्या. माझ्याच्याने उभं राहिलं जात नव्हतं. कुटुंबियांनी तिथल्या डॉक्‍टरांना माझ्याबद्दल सांगितले तेव्हा मला डॉक्‍टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये मला दाखल केले आणि उपचार सुरू केले. मला ऑक्‍सिजन लावण्यात आला होता. तिथे उपचार घेत असताना मालेगाव येथिल अहवालामध्ये माझा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला हे कळताच मी अर्धा संपलो होतो,'' असेही त्यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रोज विचारपूस

ते पुढे म्हणाले, ''रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला पॉझिटिव्ह वोर्ड मध्ये हलविण्यात आले. परंतु त्या कक्षात माझ्याकडे वैद्यकीय कुणीही लक्ष देत नव्हते. एस पी मॅडम व आय जी साहेब यांना मी एसएमएस केला की इथे माझी योग्य व्यवस्था नाहीये. त्यांनी मला तिथुन तत्काळ एम व्ही पी च्या रुग्णालयात हलवले. तिथे उपचार सुरू असताना रोज माझ्या तब्येतीची विचारपूस एसपी मॅडम व आयजी साहेब हे व्हिडिओ कॉल करून घेत माझे मनोबल उंचावण्याचा व समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या शब्द मला धीर देण्याचे काम करत होते. माझा रिपार्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे माझ्या कुटुंबियातील सर्वांना डांगसौंदणे येथे क्वारंटाईन केले होते. त्यामुळे मला अस वाटत होते की माझ्यामुळे कुटुंबाला खूप मनःस्ताप सहन करावा लागतोय. म्हणून मी पुरता खचून गेलो होतो. कुटुंब संपर्कात आपल्या मुळे त्यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे मी सुटकेचा निश्वास सोडला.''

''मालेगाव येथे ड्युटीला असताना मी घरून ये जा करायचो. ह्या कालावधी कुटुंब घराच्या वरच्या मजल्यावर व मी खालच्या मजल्यावर राहत होतो. उपचार सुरू असताना डॉक्‍टर दिवसभरातून तीन वेळा राउंड घ्यायचे. उपचारा दरम्यान सकाळी काढा द्यायचे त्यात आल्याचा रस, वेलदोडा, लवंग, हळद, मीठ टाकून काढा द्यायचे. या उपचाराच्या कालावधीत मी व्यायाम देखील केला. या उपचारा दरम्यान माझ्या आप्तस्वकीयांनी माझ्यासाठी विविध देवदेवतांना नवस कबूल केले. मविप्रच्या रुग्णालयात उपचार घेत असताना गावाकडे माझ्या निधनाची वार्ता पसरवली गेली. त्याने अजूनच खचलो परंतु मी सज्ञान असल्यामुळे मी कोरोनाच्या आजाराला चितपट केले आणि अफवांवर विजय मिळवला आहे," असे त्यांनी आवर्जून सांगितले.

शेवटी त्यांनी एक कविता सादर केली. म्हणाले,  
विझलो आज जरी मी; 
हा माझा अंत नाही 
पेटेन मी उद्या नव्याने 
हे सामर्थ्य नाशवंत नाही... 

...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख