नाशिक : पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे विकासकामे करावी लागतील. त्यासाठी कर्ज काढावे लागेल. मात्र शिवसेनेचे नेते त्याला विरोध करतात तो त्यांचा असमंजसपणा आहे. नगरसेवकांना विकासकामे नको असतील तर त्यांनी पत्र द्यावे, अशी टिका महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. क्रिसिल या वित्तीय संस्थेकडून ‘ए ए मायनस’ मानांकनाच्या आधारे कर्ज काढले जाणार आहे. भाजपकडून तीनशे कोटींच्या कर्जाचा दावा केला जात असला तरी क्रेडीट मानांकनानुसार दोनशे कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार असल्याचे बोलले जाते. त्यासाठी शासनाच्या परवानगी बंधनकारक असल्याने सत्ताधारी भाजपची अडचण होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच शिवसेनेने त्याला विरोध सुरु केला आहे.
यासंदर्भात महापौर म्हणाले, सध्या महापालिकेवर कुठलेच दायित्व नसल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी कर्ज काढणे गैर नाही. कोरोनामुळे वैद्यकीय कारणास्तव निधी खर्च झाला. पुढील वर्षी निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने विकासकामे होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु, ही बाब वस्तुस्थितीला धरून नाही.
ते म्हणाले, वास्तविक, विकासकामे सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात होणार आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात कामे करायची नसतील तर त्यांनी लेखी पत्र द्यावे, अशी खोचक सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. महसूलवाढीसाठी नागरिकांवर वसुलीसाठी सक्ती करणे कितपत योग्य होणार याचे उत्तर श्री. बोरस्ते यांनी द्यावे. यापूर्वीही महापालिकेने कर्ज घेतले व परतफेड देखील झाली. उत्पन्नवाढीसाठी बीओटी तत्त्वावर प्रकल्प होणार असून, महापालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. उलट उत्पन्न वाढणार असल्याचा दावा महापौर कुलकर्णी यांनी केला. कर्ज काढण्यास होणारा विरोध असमंजपणा आहे. दत्तक पित्याने नाशिकसाठी काय केले आहे, हे निओ मेट्रो प्रकल्प व वाहनतळ प्रकल्प जाणीवपूर्वक रखडून ठेवणाऱ्यांना काय समजणार, असा खोचक टोला महापौर कुलकर्णी यांनी बोरस्ते यांना लगावला.
...

