नवाब निष्ठावान, सदाभाऊ तुम्ही मात्र `भाजप`चे गुलाम ! - Nawab Malik is Loyal, But Sadabhau is BJP`s Slave, Maratha Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नवाब निष्ठावान, सदाभाऊ तुम्ही मात्र `भाजप`चे गुलाम !

संपत देवगिरे
रविवार, 9 मे 2021

मलिक हे तर अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व निष्ठावान आहेत. मात्र भाजपची भूमिका पुढे रेटणारे सदाभाऊ खोत तुम्ही कोणाचे गुलाम आहात?. असा प्रश्न त्यांनी केला.

नाशिक : अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक (Minority walfare minister Nawab Maliq) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम (NCP`s Slave) आहेत, असे विधान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Alligation on Sadabhau Khot) यांनी केले होते. त्याचा चांगलाच समाचार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता महेश भामरे (NCP Women Anita Bhamre) यांनी घेतला आहे. त्या म्हणाल्या, मलिक हे तर अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व निष्ठावान आहेत. मात्र भाजपची भूमिका पुढे रेटणारे सदाभाऊ खोत तुम्ही कोणाचे गुलाम आहात?. असा प्रश्न त्यांनी केला. 

त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्याने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप व त्यांची मंडळी वैफल्यग्रस्त होऊन विधाने करीत सुटली आहेत. श्री. खोत जे बोलले, हा त्याचाच भाग असावा. श्री. खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी प्रातारणा केली तेव्हाच त्यांनी स्वाभिमान व शेतकऱ्यांशी निष्ठा सोडली हे महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे त्यांनी केलेली विधाने कोणीही गांभिर्याने घेतलेली नाहीत. जर त्यांना खरोखरच मराठा आरक्षणाविषयी आस्था असेल तर ते बाजू मांडतात त्या भाजपची केंद्रात सत्ता आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. त्या भाजपकडे मागणी करण्याची हिंमत त्यांनी दाखवावी. 

श्रीमती भामरे म्हणाल्या, राजकारणात सत्ता नसली की माणूस कसा सैरभैर होतो याच उदाहरण म्हणजे श्री. खोत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी  भाजपचा पराभव करून तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळांवर अशीच संतापजनक व तत्थ्यहीन विधाने केली होती. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले तर त्याचा राग श्री. खोत मंत्री मलिक यांच्यावर काढतांना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाचे ज्येष्ठ व स्वाभिमानी नेते शरद पवार  यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात सर्व जाती धर्माचे सदस्य एकदिलाने देश व राज्याच्या हितासाठी काम करीत आहेत. पक्षात कोणालाही गुलाम म्हणून संबोधले जात नाही. उलट पक्षाने समान संधी देऊन कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे. यामुळेच पक्ष स्थापन झाल्यापासून बाविस वर्षात चौथ्यांदा राज्यात सत्तेत आहे. श्री. मलिक हे या पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यातून त्यांनी पक्षाची व सत्य बाजू मांडली. ती भाजपच्या राजकारण व चुकांवर टिका करणारी होती मात्र ती सदाभाऊंना का झोंबली याचे आश्चर्य वाटते. कारण तुम्हाला तर तो पक्ष विचारीत देखील नाही. तुमचा पक्ष वेगळा असल्याचे तुम्हीच सांगता. राष्ट्रवादी काँ सैनिकाला तुम्ही गुलाम म्हणता याची किव येते. 
...
हेही वाचा...

यामुळे आदिवासी कोरोना लसीकरणासाठी पुढे येत नाहीत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख